अखेर नांदेड महापालिकेला मिळाले आयुक्त...

अभय कुळकजाईकर
सोमवार, 6 एप्रिल 2020

नांदेड वाघाळा महापालिकेला तब्बल साडेतीन महिन्यानंतर आयुक्त मिळाले असून मीरा भाईंदर महापालिकेचे डॉ. सुनील लहाने यांची नांदेडला आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेला गेल्या साडेतीन महिन्यांपासून आयुक्तांची प्रतिक्षा होती. अखेर ती पूर्ण झाली असून महापालिकेला आयुक्त मिळाले असून मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

नांदेड महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी हे वैद्यकीय रजेवर ता. २६ डिसेंबरपासून होते. त्यानंतर त्यांची मुंबईला मंत्रालयात ग्राम विकास विभागाचे उपसचिव म्हणून बदलीही झाली. त्यानंतर तरी महापालिकेला आयुक्त मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, आयुक्त मिळायला तब्बल साडेतीन महिने वाट पहावी लागली. 

हेही वाचा - रेशनच्या धान्याबाबत राज्य सरकारचा घोळ! कोण म्हणाले वाचा...

दोन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले काम
दरम्यानच्या काळात प्रभारी आयुक्त म्हणून सुरवातीला जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काम पाहिले. दरम्यान, त्यांची शिर्डी येथील साईबाबा संस्थानला मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. त्यानंतर नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून डॉ. विपीन रुजू झाले आणि काही दिवसानंतर त्यांच्याकडे महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता व ते काम पाहत होते. या दोन्ही जिल्हाधिकारी यांनी महापालिकेचा कार्यभार सांभाळला. 

आयुक्त मिळावे म्हणून प्रयत्न 
नांदेड महापालिकेला आयुक्त मिळावेत यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण तसेच नांदेड - उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तत्काळ आयुक्त मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न करण्यात आले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. अखेर त्यास यश मिळाले असून डॉ. सुनील लहाने यांची नियुक्ती केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने हे आदेश शुक्रवारी (ता. तीन) काढले असून ते महापालिकेला मिळाल्यानंतर रविवारी (ता. पाच) त्याची चर्चा सुरू झाली. शासनाचे उपसचिव कैलास बधान यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मीरा भाईंदरचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदी प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात येत आहे. डॉ. लहाने यांना अतिरिक्त आयुक्त पदावरुन कार्यमुक्त करण्यात येत असून डॉ. लहाने यांनी नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार त्वरित स्वीकारून शासनास अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार डॉ. लहाने हे मंगळवारी (ता. सात) पदभार स्वीकारणार आहेत. 

हे ही वाचलेच पाहिजे - प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न....कोण म्हणाले ते वाचा

कोण आहेत डॉ. लहाने....
डॉ. सुनिल लहाने हे मूळचे माकेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील रहिवासी आहेत. त्यांनी परभणीच्या पशुशल्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९९८ मध्ये मुख्याधिकारीपदी निवड झाली. त्यांनी आत्तापर्यंत पैठण, वसमत, लोणावळा, इस्लामपूर या नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. त्याचबरोबर अहमदनगर, वसई विरार महापालिकेत उपायुक्त तसेच वरळी, मुंबईच्या नगरपालिका प्रशासन संचालनालयात उपसंचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. सध्या ते मीरा भाईंदर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते. नांदेड महापालिकेच्या स्थापनेपासून मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकारी नियुक्तीची ही तिसरी वेळ आहे. या आधी गणेश देशमुख व समीर उन्हाळे यांनी आयुक्तपदी काम पाहिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finally Nanded Municipal Commissioner gets Commissioner ..., Nanded news