साठविलेल्या फोममुळे स्थानिकांच्या जिवाशी खेळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

औरंगाबाद - मध्यवस्तीत इमारत. त्यातच तळमजल्यात साठवलेल्या फोमचा साठा रहिवाशांसाठी धोक्‍याचीच घंटा ठरला. त्यांच्या जिवाशी खेळ होत असून यावर ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आगीनंतर नऊ घरांतील पन्नास लोकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी पोचविण्यात आले.

औरंगाबाद - मध्यवस्तीत इमारत. त्यातच तळमजल्यात साठवलेल्या फोमचा साठा रहिवाशांसाठी धोक्‍याचीच घंटा ठरला. त्यांच्या जिवाशी खेळ होत असून यावर ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. आगीनंतर नऊ घरांतील पन्नास लोकांसह शाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी पोचविण्यात आले.

शहरातील मध्यवस्तीत असलेल्या नवाबपुरा भागात फोमची साठवणूक ही गंभीर बाब असून कायद्याच्या दृष्टीने स्वत:सोबतच इतर रहिवाशांचा जीव धोक्‍यात घालण्याचा प्रकार आहे. औरंगपुऱ्यातील फटाका मार्केटला दिवाळीदरम्यान लागलेली आग भयंकर होती. ती आगही शहराच्या मध्य व दाट लोकवस्तीतच होती. नवाबपुरा भागही दाट लोकवस्तीचा असून सुमारे पाचशे ते हजार कुटुंबांची घरे या भागात आहेत. जुनी वस्ती, अतिक्रमणे आणि घराला लागून असलेली घरे, गल्ल्याबोळ्यांमुळे आपत्कालीन स्थितीत जीव वाचवणे व मदतकार्य करणेही अवघड झाले होते. त्यातच ज्वलनशील फोमसारख्या पदार्थाचा साठा यामुळे या भागातील लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला. आग लागली तेव्हा पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली, स्थानिकांचे व बघ्यांचे लोंढे बाहेर काढण्यासाठी वाहतूक विभागालाही पाचारण करावे लागले. विशेषत: आगीनंतर पाण्याचे बंबही शक्‍य तितक्‍या लवकर पोचू शकले नाहीत. आगीची झळ पोचलेल्या घरांतील पाच ते सहा सिलिंडर जवानांनी घरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवले. तसेच घरात अडकलेल्या सुमारे नऊ कुटुंबीयांनाही सुरक्षितस्थळी पोचवले.

आगीमुळे शाळा दिली सोडून
घटनास्थळापासून सुमारे पन्नास फूट अंतरावरच उर्दू शाळा आहे. शाळेशेजारीच अग्नितांडव झाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये एकच हलकल्लोळ माजला. आगीची भयाणता पाहून शाळा सोडून देण्याची सूचना प्रशासनाने केली. त्यानंतर पाचशे मुलांना भराभर सोडून सुखरूपस्थळी पोचवण्यात आले.

संकट टळण्यासाठी मागितली दुआ
आगीमुळे स्थानिक प्रचंड घाबरले होते. आगीने लगतच्या दोन घरांना वेढल्यानंतर संकट टळण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीने ईश्‍वराचा धावा केला, आलेले संकट टळावे यासाठी त्याने दुआ मागितली.

आठ दिवसांत रस्त्यांचे काम
घटनास्थळी आलेल्या अडचणी पाहून महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी स्थानिकांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन या भागातील रस्त्यांचे आठ दिवसात काम करणार असल्याची माहिती स्थानिक रहिवाशाने दिली.

आग नियंत्रणासाठी...
अग्निशामक दलाचे दोन, एमआयडीसीचे दोन व बजाज कंपनीचा एक असे पाच बंब.
सुमारे पंधरा टॅंकर पाणी व चाळीस जवानांकडून मदतकार्य.
महापालिका आयुक्त, दोन पोलिस उपायुक्तांसह अधिकारी घटनास्थळी
वाहतूक नियंत्रण व गर्दी आवरण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा
पुढाकार घेत स्वेच्छेने हजारो हात लागले बचावकार्यात

Web Title: fire in aurangabad