आग लागली अन्‌ दडविलेल्या गुटख्याचे बिंग फुटले!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

औरंगाबाद : सिटी चौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गोदामातील गुटख्याची पोलिसांना कुणकुणही नव्हती; पण आग लागली अन्‌ बिंग फुटले. गोदामात लाखोंचा गुटखा दडवून ठेवला असल्याचे रविवारी (ता. 22) दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत समोर आले.

औरंगाबाद : सिटी चौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गोदामातील गुटख्याची पोलिसांना कुणकुणही नव्हती; पण आग लागली अन्‌ बिंग फुटले. गोदामात लाखोंचा गुटखा दडवून ठेवला असल्याचे रविवारी (ता. 22) दुपारी तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत समोर आले.

अग्निशामक दलाकडून प्राप्त माहितीनुसार, नाथगल्ली, सराफा मार्केट परिसरात खादी भांडारमागे अनिल अग्रवाल यांचे गोदाम आहे. हे गोदाम विजू रमेश तेली यांनी भाड्याने घेतले आहे. पानमसाला, सिगारेटचा माल गोदामात आहे. विशेष: म्हणजे राज्य शासनाने बंदी घातलेला गुटखाही खचाखच भरून ठेवला होता. तीनच्या सुमारास गोदामातून धूर निघू लागला. त्यामुळे बाजारपेठेत घबराट निर्माण झाली. पाहता-पाहता क्षणात आगीने गोदामाला वेढले. आगीचा भडका उडाल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचे पदमपुरा व सिडको येथून दोन बंब पाचारण करण्यात आले. जवान एल. एम. गायकवाड, सी. एल. भंडारे व एस. एम. शकील; तसेच उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोचून मदतकार्य सुरू केले. अर्धा ते पाऊण तासात जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, आगीत सुमारे सहा लाखांचे नुकसान झाल्याचा दावा विजू तेली यांनी केल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली.

हाकेच्या अंतर गोदाम, पोलिस अनभिज्ञ
पानमसाला व गुटख्या दडवून ठेवलेले गोदाम सिटी चौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. तेथूनच मालाची ने-आण व ठोक विक्री होत असताना बंदी घातलेला गुटख्याची कानोकान खबर पोलिसांना नव्हती. त्यामुळे व्यापारी व स्थानिकांनी आश्‍चर्य व्यक्त केले.

कारण गुलदस्त्यातच
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा दावा नुकसानग्रस्ताकडून केला जात आहे; परंतु आग शॉर्टसर्किटमुळे लागलीच नाही, असे महावितरणकडून सांगण्यात आले. त्यामुळे आग लागली, की लावली, याबाबत नागरिकांत संभ्रम असून, पंचनाम्याच्या अहवालानंतरच खरे कारण स्पष्ट होईल.

अन्न व औषधी विभागाला पत्र
आगीत बेचिराख झालेल्या गुटख्याचे नमुने घेण्यात आले. दडवून ठेवलेल्या गुटख्यासंबंधी अन्न व औषधी प्रशासनाला माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात साठेबाजी करणाऱ्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली असून, तूर्तास घटनेची नोंद सिटी चौक पोलिस ठाण्यात झाली.

Web Title: fire exposes illegal gutkha stock