आधीच कोरोनाचा धाक, त्यात संसार खाक 

दिलीप पवार
Wednesday, 15 April 2020

सालगडी ज्ञानेश्वर पवार यांनी उचल केलेले पैसे, जवळची वर्षभराची बचत अशी जवळपास दीड लाख रुपयांची रक्कम घरात डब्यात ठेवली होती. आगीत दीड लाख रुपयांच्या नोटाही जळाल्या. डोळ्यासमोर कष्टाचा पैसा होत्याचा नव्हता झाला. 

अंकुशनगर (जि.जालना) - गॅस गळतीमुळे घरात आग लागली. त्यात संसार तर खाक झाला. शिवाय उचलीचे तसेच बचतीचे डब्यात ठेवलेले तब्बल दीड लाख रुपयांच्या नोटाही जळाल्या. आधीच कोरोनाचा धाक, त्यात संसार खाक अशी स्थिती झाली. अंबड तालुक्यातील सौंदलगाव येथे बुधवारी (ता.१५) सकाळी साडेदहा वाजता ही घटना घडली. 

सौंदलगाव येथील ज्ञानेश्वर तुकाराम पवार (वय ३२) हे सालगडी आहेत. त्यांच्या घरात पत्नी बुधवारी सकाळी घरकाम करत होती. तेव्हा अचानक गॅस सिलिंडरची गळती सुरू झाली. त्यातच सिलिंडरने पेट घेतला.

हेही वाचा :  शेतातील अकरा क्विंटल गहू गरजूंसाठी राखीव 

प्रसंगावधान राखत ज्ञानेश्‍वर यांच्या पत्नी घराबाहेर आल्या. त्यांनी शेजाऱ्यांना सिलिंडरने पेट घेतल्याचे सांगितले. तोपर्यंत घरातील साहित्याने पेट घेतला. आगीने रौद्र रूप धारण केले.

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

शेजारी व गावातील ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही. त्यामुळे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. कारखान्याच्या अग्निशमन कर्मचारी सी. बी. खरात, एन. एस. खोजे, डी.व्ही. साठे यांनी ही आग पाण्याचा मारा करून विझविली. 

संसार पडला उघड्यावर 

सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या या आगीत ज्ञानेश्वर पवार यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. बाजरीचे १० पोते, गव्हाचे २ पोते, ३० किलो तांदूळ जळाला. आठवडाभरासाठी खरेदी केलेला भाजीपालाही खराब झाला. त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. 

कष्टाचा पैसा होत्याचा नव्हता 

सालगडी ज्ञानेश्वर पवार यांनी उचल केलेले पैसे, जवळची वर्षभराची बचत अशी जवळपास दीड लाख रुपयांची रक्कम घरात डब्यात ठेवली होती. आगीत दीड लाख रुपयांच्या नोटाही जळाल्या. डोळ्यासमोर कष्टाचा पैसा होत्याचा नव्हता झाला. 

प्रशासनाकडून पंचनामा 

आगीच्या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी सौंदलगाव सजाचे तलाठी संतोष जैस्वाल यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या वस्तूचा पंचनामा केला आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त सालगडी ज्ञानेश्‍वर यांना प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire in house at Soundalagaon