'या' दोन गावांना मिळणार कर्जमुक्तीचा पहिला लाभ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लोहा तालुक्यातील सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याची प्रक्रिया सोमवारी (ता. २४) कामठा येथे सुरू झाली.

नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लोहा तालुक्यातील सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ सोमवारी (ता. २४) करण्यात आला. यामुळे कर्जमाफीचा पहिला लाभ या गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.

आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सुरु 
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत लोहा तालुक्यातील सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याची प्रक्रिया सोमवारी (ता. २४) कामठा येथे सुरू झाली. या वेळी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रवीण फडणीस, अर्धापूर तहसीलदार सुजीत नरहरे, सहायक निबंधक अमरसिंह चौहान यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा बँकेचे तपासणीस, ग्रामपंचायत सदस्य, गटसचिव व शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचलेच पाहिजे....परभणी- मुदखेड दुहेरीकरणाने वाढणार रेल्वेंची गती

सोनखेड, कामठ्याला लाभ
सोनखेड येथील २६१ व कामठा बुद्रुक येथील १६२ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यांचे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर या याद्या ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची शहानिशा करून त्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. या वेळी उपस्थितांनी प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली, तसेच त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोचपावत्यांचे वितरणही करण्यात आले. जिल्ह्यातील दोन लाख १९ हजार ६३२ थकबाकीदार शेतकरी सभासदांना अंदाजे एक हजार ४६१ कोटींखी कर्जमाफी होऊन ते कर्जमुक्त होतील, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

हेही वाचा....एलआयसीचा हा विभाग पॉलिसी वितरणात देशात अव्वल- कोणता चे वाचा

शुक्रवारपर्यंत सर्वच याद्या पाहता येणार
जिल्ह्यातील दोन लाख १९ हजार ६३२ शेतकऱ्यांपैकी योजनेस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या शुक्रवारपर्यंत (ता. २८) संकेतस्थळावर उपलब्ध होतील, असे प्रवीण फडणीस यांनी सांगितले. आजपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ६६१ शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे. 

आधार प्रमाणीकरणानंतर मिळणार प्रमाणपत्र
जिल्ह्यात एक हजार ५४५ आपले सरकार केंद्र व जिल्ह्यातील सर्व बँकास्तरावर आधार प्रमाणीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांने आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र, बँकेचे शाखेकडून आधार प्रमाणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असे श्री. फडणीस यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first benefit of debt relief will be given to these two villages, nanded news