हिंगोलीत पहिल्याच दिवशी पावणे दोन लाखाची मदत

राजेश दारव्हेकर
Wednesday, 8 April 2020

 शहरात कोणी उपाशी राहू नये यासाठी  पालिकेने सामाजिक संस्‍था, मंडळे, लोकप्रतिनिधी, अन्नदाते आदींना आवाहन करून गरजूंपर्यंत अन्न पुरविण्याचे आवाहन केले होते. या अहवानाला प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी तब्बल दोन लाखाची मदत जमा झाली आहे.

हिंगोली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मदत संकलन केंद्र सुरू केले असून पहिल्याच दिवशी मंगळवारी (ता. सात) एक लाख ७७ हजार ३०० रुपयांची रोख रक्‍कम व १२ क्‍विंटल ६० किलो धान्याची मदत जमा झाल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र उपाययोजना सुरू आहेत. प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी या कामी रात्रंदिवस लक्ष ठेवून आहेत. संचारबंदी व सीमा बंद झाल्याने परप्रांतीय नागरिक शहरात अडकले आहेत. तसेच मजुरांची कामे थांबल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा सिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा

अन्न पुरविण्याचे आवाहन

 शहरात कोणी उपाशी राहू नये यासाठी  पालिकेने सामाजिक संस्‍था, मंडळे, लोकप्रतिनिधी, अन्नदाते आदींना आवाहन करून गरजूंपर्यंत अन्न पुरविण्याचे आवाहन केले होते. त्‍याला प्रतिसाददेखील चांगला मिळाला. शहरातील कानाकोपऱ्यांतील गरजूंना अन्नधान्य व भोजनाची पाकिटेदेखील मिळाली आहेत. 

कर्मचारी घरपोच मदत स्वीकारतील

संचारबंदीचा कालावधी (ता. १४) एप्रिलपर्यंत असल्याने शहरातील गरजूंना नियमित अन्नधान्य व भोजन मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने मदत संकलन केंद्र सुरू केले आहे. कोणीही घराबाहेर न पडताही मदत करू शकता. त्यासाठी पालिकेकडे संपर्क करावा, कर्मचारी घरपोच येऊन मदत स्वीकारतील, यासाठी तांदूळ, गहू, डाळ, साबण, टूथपेस्ट, बिस्कीट, नवीन कपडे आदी साहित्य मदत करू शकता, असे आवाहन करण्यात आले होते. 

१२ क्विंटल ६० किलो धान्य जमा

यात मुख्यमंत्री कोरोना रिलीफ फंडामध्ये आर्थिक मदतही जमा करण्याचे आवाहन केले होते. त्‍याला प्रतिसाद देत हजारो हात समोर आले असून मंगळवारी एकाच दिवसात मदत केंद्रात एक लाख ७७ हजार ३०० रुपये जमा झाले आहेत. दानशूरांनी धान्य, साखर, खाद्यतेल जमा केले आहे. यात सुभाष लदनिया, ए. आर. खान, सचिन गुंडेवार, पवन उपाध्ये, दीपक शेठी, नरेश देशमुख, नितीन बांगर, श्री. कीर्तनकार, सागर मुंदडा, नवनीत परतवार यांच्याकडून एकूण १२ क्विंटल ६० किलो धान्य जमा झाले आहे. 

येथे क्लिक कराबॅंक, पोस्टात एका वेळी चारच ग्राहकांना प्रवेश

एक लाख ७७ हजार ३०० रुपये जमा

तर अतुल निलावार, चौरसिया परिवार, आनंद निलावार, गोंविद अग्रवाल, रघूसेठ शर्मा, मोहन देशमुख, आंनद भट, दीपक अग्रवाल, मनोज जैन, संदीप टाले, हिंगोली अर्बन महिला को. आॕप. बँक, हिंगोली, जगजित खुराणा यांच्याकडून एकूण एक लाख ७७ हजार ३०० रुपये जमा झाल्याचे मुख्याधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the first day in Hingoli, two lakhs of aid is available Hingoli news