सिनेस्टाइल पाठलाग करून पकडला दोन लाखांचा गुटखा

संजय कापसे
Wednesday, 8 April 2020

ग्रामस्थ व पोलिस मागे लागल्याने जीपचालकाने घाबरलेल्या अवस्थेत भरधाव जीप चालवण्याचा प्रयत्न केला. यात पिंपळदरी येथील एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. या वेळी जीपमध्ये दोन लाखांचा गुटखा आढळून आला असून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कळमनुरी (जि. हिंगोली) : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या जीपचा सिनेस्टाइल पाठलाग करत ग्रामस्थांच्या मदतीने कळमनुरी पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा पकडला. यावेळी चालकानेही पोलिस व ग्रामस्थांना हुलकावणी देत जीप चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेगात जीप चालविण्याच्या प्रयत्नात एका विद्युत खांबाला धडक बसल्याने चालकाचे प्रयत्न फसले व अलगद जीपमधील तिघेजण पोलिस व ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. ही घटना मंगळवारी (ता. सात) रात्रीच्या वेळी घडली. 

औंढा नागनाथ येथील काही जण सिरसम (ता. हिंगोली) येथून गुटखा खरेदीकरून क्रुझर जीप क्रमांक एमएच ३८ व्ही २२७५ मधून मंगळवारी (ता.सात) रात्री उशिरा आडमार्गाने औंढा येथे जात होते. या वेळी चिंचोली येथे रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या ग्रामस्थांनी जीप थांबवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. या वेळी जीपचालकाने भरधाव वेगाने जीप पळविली.

हेही वाचाप्रशासनाला सहकार्य करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड

संशय वाढल्याने पोलिसांना दिली माहिती

 त्यामुळे ग्रामस्थांचा संशय वाढला. त्यांनी या प्रकाराची माहिती मसोड येथील ग्रामस्थांना दिली. मात्र, जीपचालकाने खानापूर मार्गे कळमनुरीला जीप आणली. मसोडफाटा येथून काही ग्रामस्थांनी जीपचा पाठलाग केला. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली तोपर्यंत जीप बसस्थानक परिसरात दाखल झाली.

पोलिस पथकाने केला पाठलाग

 बसस्थानक परिसरात पोलिस बंदोबस्त असल्याचे पाहून जीपचालकाने पोस्ट ऑफिस कार्यालयाकडे गाडी वळवून सांडस मार्गे सालेगाव येथून पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी गावात ग्रामस्थांनी केलेली नाकाबंदी तोडून जीपचालकाने नांदापूर मार्गे जीप पिंपळदरी मार्गावर घेतली. या प्रकाराची माहिती मिळाल्यामुळे पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, कर्मचारी सुनील रिठे, प्रशांत शिंदे, गणेश सूर्यवंशी, विश्वनाथ दळवी, निरंजन नलवार यांची दोन पथके स्थापन करून उमरा फाटा व सांडस मार्गे जीपचा पाठलाग सुरू केला.

विजेच्या खांबाला जोरदार धडक

 ग्रामीण भागातून चोरटे फिरत असल्याच्या कारणावरून काही दिवसांपासून गावपातळीवर ग्रामस्थांची गस्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकानेही जीपचा पाठलाग सुरू केला. तसेच पोलिसांनीही गाडीचा पाठलाग सुरू केल्याचे लक्षात येताच जीपचालकाने घाबरलेल्या अवस्थेत भरघाव जीप चालवण्याचा प्रयत्न केला. यात पिंपळदरी येथील एका विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. 

तिघांना चांगलाच दिला चोप

येथेही ग्रामस्थांचा जागता पहारा सुरू होता. हा प्रकार पाहून पिंपळदरी येथील ग्रामस्थांनी जीपमधील दोघा-तिघांना चांगलाच चोप दिला. तोपर्यंत कळमनुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी तेथे पोचले. त्यानंतर ग्रामस्थांच्या तावडीत सापडलेल्या जीपमधील सद्दाम खा सिकंदर खान पठाण, शेख शहाबुद्दीन खाजा बागवान (रा. शिरड शहापूर), आनंद मारुती मामडे (रा. औंढा) यांना ताब्यात घेतले. 

येथे क्लिक कराबॅंक, पोस्टात एका वेळी चारच ग्राहकांना प्रवेश

मुद्देमाल घेतला ताब्यात

त्यांच्यासह जीपही पोलिसांनी ताब्यात घेत कळमनुरी पोलिस ठाणे गाठले. कळमनुरीत जीपची तपासणी केली असता जीपमध्ये दोन लाख नऊ हजार तीनशे रुपये किमतीचा वजीर नावाचा गुटका आढळून आला. पोलिसांनी गुटख्यासह पाच हजार रुपयांचा मोबाइल व चार लाख रुपये किमतीची जीप, असा एकूण सहा लाख १४ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. जीपमधील तिघांसह राम इंगळे (रा.सिरसम), विठ्ठल गडदे (रा.औंढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police seize two lakh ghutka Hingoli news