बॅंक, पोस्टात एका वेळी चारच ग्राहकांना प्रवेश 

Ruchesh jaivanshi photo
Ruchesh jaivanshi photo

हिंगोली : बँकांमधील गर्दी, विविध लोकांनी हाताळलेले पासबुक व चलनी नोटांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँका आणि पोस्ट ऑफिस कार्यालयांना सूचना देण्यात आल्या असून गर्दी होणार नाही, विषाणूंचा संसर्ग होणार नाही, यासंदर्भात सूचनांचे पालन करण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

ग्राहकांनी अत्यावश्यक काम असेल तरच बँकेच्या शाखेत यावे, सर्दी, ताप, खोकला आदींचा त्रास असलेल्या ग्राहकांनी बँकेत येणे टाळावे, मुख्य प्रवेशद्वारावर गार्ड नेमण्यात यावा, शाखेमध्ये एका वेळेस फक्त चार ग्राहकांना प्रवेश द्यावा, पोस्ट व बँकामध्ये येणाऱ्या ग्राहकांची एका काउंटरवर एका वेळी एकच ग्राहक राहील याची दक्षता घ्यावी.

दहा ते दुपारी दोनपर्यंत रोखीचे व्यवहार

ग्राहकांनी बँकेच्या काउंटरपासून तीन ते पाच फुटांचे अंतर ठेवावे, सर्व बँका सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत रोखीचे व्यवहार करू शकतील. बँक फक्त रोख पैसे देणे व पैसे जमा करून देणे व पैसे पाठविणे व मागविणे हे काम करू शकतील. कर्जविषयक कामे बंद राहतील. (ता. १४) एप्रिलपर्यंत शिल्लक रक्कम चौकशी, केवायसी अद्यावतीकरण, आधारकार्ड व पॅनकार्ड संलग्नीकरण, बँक खाते अद्यावतीकरण, बँक स्टेटमेंट, पासबुक प्रिंटिंग आदींसाठी बँकेत येऊ नये.

निर्जंतुकीकरण करण्यात यावे

 पोस्ट ऑफिस व बँकेच्या एटीएममध्ये एका वेळी एकच ग्राहक प्रवेश करेल. उर्वरित ग्राहकांना दोन ते तीन फूट अंतरावर थांबण्यास सांगावे, एटीएम मशीनचे दरवाजे निर्जंतुकीकरण करण्यात यावे. बँकांनी एटीएम, कॅश, चेक, डिपॉजिट मशीन, पासबुक, प्रिंटर्स व शाखेतील उपकरणांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. इंटरनेट बँकीग, मोबाइल बँकिंग, यूपीआय, एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन आदी सुविधांचा जास्तीत-जास्त वापर करण्याबाबत बँकांनी नागरिकांना प्रेरित करावे आदी सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत.


रेशन दुकान, बँकांत ग्राहकांच्या रांगा

हिंगोली :  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. तसेच एका ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्‍हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्‍याचे पालनदेखील केले जात आहे. मात्र, दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी (ता. सात) बँकांत ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. तसेच स्‍वस्‍तधान्य दुकानांत धान्य खरेदीसाठी लाभार्थींनी गर्दी केली होती.

शुक्रवारी बाजार सुरू होणार

जिल्‍ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्‍हा प्रशासनाने तीन दिवस कडकबंद पाळण्याचे आदेश दिले होते. दिवसाआड सुरू असलेला बाजार बंद करून तो सोमवारी (ता.सहा) सकाळी नऊ ते एक या वेळात सुरू केला होता. या वेळात बाजारात झालेली गर्दी पाहता जिल्‍हाधिकारी यांनी आता शुक्रवारी (ता. दहा) बाजार सुरू होणार असल्याचे आदेश दिले आहेत. यामुळे औषधी दुकानांशिवाय इतर दुकाने आता उघडणार नाहीत.

दोन दिवस बँकांना सलग सुट्या

दरम्‍यान, रविवार व सोमवार असे दोन दिवस बँकांना सलग सुट्या आल्या. त्यामुळे मंगळवारी बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. येथे सोशल डिस्‍टन्स पाळण्यात येत होता. तसेच शहरातील अनेक स्‍वस्‍तधान्य दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वाटप केले जात असल्याने येथे गर्दी झाली होती. मात्र, प्रत्‍येकांना सोशल डिस्‍टन्स पाळण्याचे सांगण्यात येत होते. त्‍याचे पालनदेखील शिधापत्रिकाधारक करीत होते. अनेकांनी मास्‍क व रुमालाचादेखील वापर केला होता.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com