कर्ज वितरणाचा पहिला दिवस शेतकऱ्यांसाठी धावपळीचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

जरंडी : सोयगावसह तालुक्यात जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वितरणाचा मुहूर्त गुरुवारी निघाला. परंतु सातबारे मिळत नसल्याने कर्ज मिळण्यासाठी लागणाऱ्या संचिकाची जुळवाजुळव करतांना पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सातबाऱ्याअभावी दमछाक झाली होती. महिनाभरापासून शेतीचे उतारेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कर्ज मिळण्याचा पहिला दिवस निघून गेला आहे.

जरंडी : सोयगावसह तालुक्यात जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वितरणाचा मुहूर्त गुरुवारी निघाला. परंतु सातबारे मिळत नसल्याने कर्ज मिळण्यासाठी लागणाऱ्या संचिकाची जुळवाजुळव करतांना पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सातबाऱ्याअभावी दमछाक झाली होती. महिनाभरापासून शेतीचे उतारेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कर्ज मिळण्याचा पहिला दिवस निघून गेला आहे.

जिल्हा बँकांच्या शाखांनी तातडीने जुन्या आणि नवीन खातेदार शेतकऱ्यांना त्वरित पिककर्ज उपलब्ध करून देण्याच्या मार्गदर्शक सुचना मिळताच बँकांनी कर्ज वितरणाच्या संचिका वाटप करून शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बँकेत संचिका जमा करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या होत्या. परंतु गुरुवारीही सातबारे न  मिळाल्याने शेतकऱ्यांची गोची झाली होती. पिककर्जाच्या संचिकेला शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणी करून पुन्हा सातबारयासाठी तहसील कार्यालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु सर्वर डाऊन अभावी पिककर्ज वितरणाचा पहिला दिवसही निघून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेती उताऱ्यांचे सर्वर चालू होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असून दुसरीकडे बँका शेतीचा उतारा जोडल्याशिवाय संचिका स्वीकारत नसल्याने शेतकऱ्यांना सातबारे मिळत नसल्याने पुन्हा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

तहसीलचे प्रयोग अयशस्वी 
दरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे उतारे मिळावे यासाठी सोयगाव तहसीलच्या वतीने नवनवीन प्रयोग करण्यात येत आहे. सर्वर चालू होत नसल्याने संबंधित संकेतस्थळाच्या व्यतिरिक्त नवीन संकेतस्थळ तयार करून महसूल विभागाने सातबारे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोही अयशस्वी ठरल्याने अखेरीस शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे.

कर्ज वितरणात दुजाभाव

दरम्यान जिल्हा बँकेच्या शाखेत खातेदार असलेल्या जुन्या खातेदारांना जुन्याच कर्ज वितरण धोरणातून कर्ज वितरण करण्यात येत आहे. जीरायतीला एकरी 15 हजार आणि बागायतीला एकरी 30 हजार. याप्रमाणे वाटप करण्याचा निर्णय घेवून नवीन कर्जदार शेतकऱ्यांना नवीन नियमानुसार कर्ज वितरण करण्यात येत असताना त्यांच्यासाठी क्षेत्राची मर्यादा घालून देण्यात आली आहे. नवीन सभासदांना जिरायतीसाठी एकरी 19 हजार आणि बागायतीसाठी एकरी 38 हजार याप्रमाणे कर्ज वितरण करण्यात येत आहे. परंतु यासाठी नवीन सभासदांना क्षेत्राची मर्यादा घालण्यात आल्याने कर्ज वितरण प्रणालीत जिल्हा बँकांचा दुजाभाव सुरु असल्याचे कर्जदार शेतकऱ्यांनी सांगितले.

Web Title: The first day of the loan distribution is a runway for farmers