दिव्यांगासाठीचे पहिले आयटीआय लातूरला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

दिव्यांगांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. दिव्यांगासाठी राज्यातील पहिले स्वतंत्र आयटीआय प्रशिक्षण केंद्र लातूर येथे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. 

निलंगा(जि. लातूर) ः दिव्यांगांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी केंद्र, राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. दिव्यांगासाठी राज्यातील पहिले स्वतंत्र आयटीआय प्रशिक्षण केंद्र लातूर येथे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली. 

मुबईतील भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे समन्वयक नामदेव कदम यांच्या पुढाकाराने निलंगा, देवणी शिरूर आनंतपाळ तालुक्‍यातील दिव्यांगाना मोफत सहाय्यक उपकरणाचे वाटप आज येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हापरिषद अध्यक्ष मिलिंद लातूरे, समाज कल्याण सभापती संजय दोरवे, कृषी सभापती बजरंग जाधव, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, दगडू साळुंखे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, नगरसेवक हरिभाऊ कांबळे, इरफान सय्यद, शरद पेटकर भगवान कांबळे आदी उपस्थित होते. 

मंत्री निलंगेकर म्हणाले, दिव्यांगाना जास्तीत जास्त सवलती, प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने वेगवेगळ्या योजना सुरु केल्या आहेत. आगामी काळात या योजनांची व्याप्ती वाढणार असून प्रशिक्षणांवर भर दिला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तीने खचून न जाता उमेदीने जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी. शासन, प्रशासन आपल्या पाठीशी आहे. 

कार्यक्रमाचे संयोजक नामदेव कदम यांनी दिव्यांगासाठी देशभरात अशा पद्धतीचे शिबिर घेऊन मोफत सहाय्यक उपकरण देण्याचा सातत्याने उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. हा कार्यक्रम 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना उपकरण दिले जाईल, असे ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first ITI for disabled will established at Latur