बीड जिल्ह्यात पाचशेची बनावट नोट आढळली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 डिसेंबर 2019

बीड जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या आडस (ता. केज) येथील बाजारपेठेतील पाचशे रुपयांची बनावट नोट आढळली आहे. यामुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

केज (जि. बीड) - केज तालुक्‍यातील आडस हे आठवडे बाजारपेठ असणारे महत्त्वाचे गाव आहे. खरेदी-विक्री करण्यासाठी आसपासच्या परिसरातून अनेकजण येथे येतात. दुकानात ग्राहकांची गर्दी असताना किराणा माल खरेदी करून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दुकानदारास दिल्या. हा प्रकार मंगळवारी (ता. 24) निदर्शनास आल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यामुळे सध्या व्यापारी फसवणूक झाल्यामुळे नोटा खात्री करूनच स्वीकारत असल्याचे दिसत आहे. 

तालुक्‍यातील आडस येथे मागील महिन्यात अशाच प्रकारे शंभर रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आल्याची चर्चा होती. त्यातच शिवाजी महाराज चौकातील किराणा दुकानात या आठवड्यात ग्राहकाने किराणा सामान खरेदी करून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा दुकानदाराला दिल्या.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

ग्राहकांची गर्दी असल्याने नोटांची दुकानदाराला खात्री करता आली नाही. त्यानंतर दुकानदाराने जमा झालेली रक्कम लातूर येथील किराणा मालाच्या व्यापाऱ्यास दिली. तो व्यापारी रक्कम जमा करण्यासाठी बॅंकेत गेला असता बॅंकेच्या कॅशिअरच्या बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. 

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-

बॅंक कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून आडस येथील किराणा मालाच्या दुकानदारास ग्राहकाने पाचशेच्या दोन बनावट नोटा दिल्याचे भ्रमणध्वनीवरून कळविले. त्यावेळी बॅंक कॅशिअरने नोटांच्या बंडलातून बाहेर काढलेल्या दोन बनावट नोटा संबंधित व्यापाऱ्यामार्फत आडसच्या दुकानदाराला परत केल्या. त्या बनावट नोटा असल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्याने गावातील व्यापाऱ्यांना या प्रकाराची माहिती दिल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली.

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

सध्या व्यापारी ग्राहकांकडून आलेल्या नोटांची खात्री करूनच रक्कम स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे; मात्र अशा प्रकारच्या किती नोटा आल्या असतील? याविषयी ग्रामस्थांत तर्कवितर्क सुरू आहे. 

 

ग्राहकांची गर्दी असल्याने नोटांची खात्री करता आली नाही. यापुढे कोणाची फसवणूक होणार नाही, यासाठी घाईतही नोटा तपासून घ्याव्यात. असा प्रकार उघडकीस आल्यास इतरांना माहिती द्यावी. 
- लक्ष्मण आकुसकर, 
किराणा दुकानदार, आडस 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred fake notes were found in Beed district