Jalosha1
Jalosha1

‘या’ जिल्ह्यात पाच पंचायत समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात

परभणी ः जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी शुक्रवारी पार पडल्या. पाच पंचायत समित्या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीकडे कायम राहिल्या तर परभणीत शिवसेनेने काँग्रेसला धक्का देत सत्ता स्थापन केली. गंगाखेड येथे रासपने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली असून पालममध्ये घनदाट मित्रमंडळाला सत्ता कायम राखण्यात यश आले आहे. मानवत येथे कॉँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने सत्ता कायम राखली आहे.

अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आणि विधानसभा निवडणुकीची मुदतवाढ संपल्यामुळे शुक्रवारी पंचायत समित्यांच्या सभापती उपसभापती यांच्या निवडी पार पडल्या. मागील १५ दिवसांपासून या निमित्ताने गावपातळीवरील राजकारण ढवळून निघाले होते. पाच पंचायत समित्या वगळता परभणी, पालम, गंगाखेड येथे चुरस निर्माण झाली होती. जिंतूर, सेलू, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा येथे राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत असल्याने फारशी चुरस झाली नाही. पूर्णा येथे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. 

परभणीत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
परभणीत मागील कार्यकाळात काँग्रेसने भाजपच्या मदतीने सभापतीपद मिळवले होते. यावेळेस शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अशी शक्यता वाटत असतानाच आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत दोन्ही पदे शिवसेनेकडे बिनविरोधपणे खेचले. मागील चार ते पाच दिवसांपासून शिवसेनेच्या सदस्यांना नांदेडला हलवले होते. त्यांच्यासोबत दोन भाजपचे सदस्य असल्याची चर्चा होती. काँग्रेस आणि शिवसेनेकडे प्रत्येकी आठ सदस्य असल्याने भाजपचे तीन सदस्य कोणाकडे जातात याकडे लक्ष लागले होते. आजच्या निवडणुकीत सर्व २० सदस्य उपस्थित होते. मात्र केवळ शिवसेनेच्या दोन सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यानिमीत्ताने आमदार डॉ. राहुल पाटील यांनी राजकीय चातुर्य दाखवून दिले आहे.

पूर्णेत महाविकास आघाडीचा फार्म्युला
पूर्णा पंचायत समितीमध्ये मागील कार्यकाळात राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेतले होते. यावेळेस मात्र महाविकास आघाडीचा फार्म्युला वापरत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली आणि राष्ट्रवादीकडे सभापतीपद तर शिवसेनेकडे उपसभापती गेले.

या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा
जिंतूर, पाथरी, सोनपेठ आणि सेलू येथे स्पष्ट बहुमत असल्याने राष्ट्रवादीचे सदस्य पदावर विराजमान झाले. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृवात जिल्ह्यात पाच पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. तर शिवसेनेला दोन ठिकाणी सभापतीपद आणि दोन ठिकाणी उपसभापतीपद मिळाले आहे.

गंगाखेडमध्ये रासपला राष्ट्रवादी आणि शिवसेनेची मदत
सर्वाधिक चर्चा होती ते गंगाखेड पंचायत समितीची गंगाखेडला रासपने मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांना अज्ञातस्थळी हलवले होते. त्यामुळे रासपचा सभापती होणार हे जवळपास निश्चित झाले होते आणि आज तसे घडलेही. रासपने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता स्थापन केली आहे. पाठींब्याच्या बदल्यात राष्ट्रवादीकडे उपसभापतीपद आले आहे.

मानवत शिवसेनेकडे
मानवत येथे शिवसेनेच्या सदस्यांत फुट पडल्यानंतर कॉँग्रेसच्या दोन सदस्यांच्या मदतीने शिवसेनेने सत्ता कायम राखली आहे.

भाजपला पालममध्ये मिळाले स्थान
पालम येथे घनदाट मित्रमंडळाकडे सभापतीपद गेले आहे. पालम पंचायत समितीच्या आठ सदस्यांमध्ये घनदाट मित्रमंडळ तीन, राष्ट्रवादी कॉँग्रेस दोन, भाजपा दोन व रासपाचा एक सदस्य आहे. यापुर्वी घनदाट मित्रमंडळाने राष्ट्रवादीला सोबत घेतले होते. यावेळेस मात्र भाजपाच्या सोबतीने सत्ता स्थापन केली आहे. जिल्ह्यात एकमेव पंचायत समितीमध्ये भाजपला स्थान मिळाले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com