esakal | औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयात पाच वाघ अतिरिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

वाघ

आठची मर्यादा, संख्या गेली तब्बल 13 वर 

औरंगाबाद : प्राणिसंग्रहालयात पाच वाघ अतिरिक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद -अपुरी जागा, पिंजऱ्यांची चुकीच्या पद्धतीने केलेली मांडणी, मास्टर प्लॅनकडे दुर्लक्ष यामुळे अडचणीत आलेल्या महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सुखद चित्र आहे. प्राणिसंग्रहालयात आठ वाघ ठेवण्याची परवानगी आहे. दोन वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात नऊ वाघ असल्यामुळे राज्यात दोन ठिकाणांहून वाघांना मागणी आली. त्यात समृद्धी या वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिल्यामुळे आता संख्या तब्बल 13 वर गेली आहे. 

मराठवाड्यात एकमेव असलेल्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयात दीडशेहून अधिक प्राणी आहेत. त्यात वाघ, बिबटे, अस्वल, कोल्हे यासह नीलगायी व हरणांचा समावेश आहे. सर्वाधिक आकर्षण आहे ते वाघांचे. त्यामुळे शहरात येणारे लाखो पर्यटक महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. देशभरात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असताना औरंगाबादेत मात्र जन्मदर चांगला आहे. आतापर्यंत 22 वाघ प्राणिसंग्रहालयात जन्मले आहेत. त्यातील अनेक वाघ देशभरातील प्राणिसंग्रहालयांना महापालिकेने दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी तीन बछडे जन्मले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यात चार बछड्यांना समृद्धी या वाघिणीने जन्म दिला. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात वाघांची संख्या 13 वर गेली. समृद्धीच्या बछड्यांना अद्याप मोकळ्या वातावरण सोडण्यात आलेले नसले तरी वाघांची संख्या मात्र मर्यादेपेक्षा पाचने जास्त झाली आहे. प्राणिसंग्रहालयात उपलब्ध जागेनुसार केवळ आठ वाघ ठेवता येतात. दोन वर्षांपूर्वीच प्राणिसंग्रहालयात नऊ वाघ होते. त्यामुळे अतिरिक्त वाघ इतर ठिकाणी देण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र महापालिकेने अद्याप वाघ दिलेले नाहीत. त्यात आणखी चार बछडे जन्मल्यामुळे येणाऱ्या काळात मागणी वाढण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली. 
 
मुंबई, सोलापूरहून मागणी 
सिद्धार्थ उद्यानातील दोन पिवळे वाघ द्यावेत, अशी मागणी मुंबई व सोलापूर महापालिकेने झू ऍथॉरिटीकडे केली होती. त्यानुसार महापालिकेला कळविण्यातही आले. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्यातरी शहरवासीयांना तब्बल 13 वाघांचे दर्शन होणार आहे. 
 

उद्यानातील प्राणी 
वाघ 13 
बिबटे 03 
सांबर 47 
नीलगायी 03 
चितळ 02 
सायाळ 02 
कोल्हे
मगर
माकड 10 
साप 100 
loading image
go to top