जायकवाडीत पाहुण्या पक्ष्यांचे आगमन लांबले, हवामान बदलाचा फटका

चंद्रकांत तारू
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

यंदा हवामान बदलाचा फटका निसर्गातील प्रत्येक घटकाला बसला आहे. अवकाळी पाऊस, बदललेले ऋतुमान, वारंवार निर्माण होणारी चक्रीवादळे यामुळे दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जायकवाडी पक्षी अभयारण्यात होणारे परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. यामुळे पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांना पाहुण्या पक्ष्यांची प्रतीक्षा आहे.

पैठण (जि.औरंगाबाद) ः यंदा हवामान बदलाचा फटका निसर्गातील प्रत्येक घटकाला बसला आहे. अवकाळी पाऊस, बदललेले ऋतुमान, वारंवार निर्माण होणारी चक्रीवादळे यामुळे दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जायकवाडी पक्षी अभयारण्यात होणारे परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. यामुळे पक्षीप्रेमी आणि अभ्यासकांना पाहुण्या पक्ष्यांची प्रतीक्षा आहे.

हजारो किलोमीटरचा प्रवास करून गेल्या अनेक वर्षांपासून पाहुण्या पक्ष्यांचे जायकवाडी पक्षी अभयारण्यात आगमन होते. परंतु यंदा ऋतुमानात प्रचंड बदल झाल्याने हे पक्षी अद्याप दाखल झाले नसल्याचे चित्र नाथसागर परिसरात आहे. पक्षीमित्रांच्या आनंदावर सध्या तरी विरजण पडले आहे.
सद्यःस्थितीत अतिवृष्टी, अवर्षण व वादळ यामुळे दिवसागणिक वातावरण बदलत आहे. त्यामुळे परदेशातील पक्षी येण्यास यंदा विलंब झाला आहे. ऑक्‍टोबर महिना सुरू झाला की, जायकवाडी पक्षी अभयारण्याचा नाथसागराचा परिसर पक्ष्यांच्या थव्यांनी गजबजून जातो.

हेही वाचा- मारु नका,सर्व देताे, चाेरट्यांना विनंती

लाखोंच्या संख्येने येणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांना भरपूर खाद्य उपलब्ध होत असल्याने या पक्ष्यांचा मुक्काम येथे असतो. पावसाळा संपल्यानंतर देश-विदेशांतील पक्षी विनाखंड येथे येण्याची आता प्रत्येक हिवाळ्यात परंपरा झाली आहे. विविध प्रजातींचे हे पक्षी प्रजननाच्या काळातही येथे येत असल्याने त्यांचे प्रजनन येथेच होते. रशिया, तिबेट, चीन, पाकिस्तान, नेपाळ, सैबेरिया आदी देशांतून हे पक्षी येत असतात. त्यात फ्लेमिंगो, कॉमनटेल, स्पुनबिल, पोटेंडस्ट्रोक, नाईट हेरॉन, व्हाईट स्ट्रोक, वागटेल आदी 250 विविध जातींच्या पक्ष्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - वाहनांचे सुटे भाग चाेरणारी टाेळी जेरबंद, दाेन लाखांच मुद्देमाल जप्त

 

निसर्गाच्या बदलत्या वातावरणामुळे जायकवाडी पक्षी अभयारण्यात ऑक्‍टोबर महिन्यात होणारे आगमन झाले नाही. त्यामुळे हजारो किलोमीटर प्रवास करून अथांग नाथसागराच्या कुशीत वास्तव्यास येणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांच्या प्रवासात अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळा लांबून मोठा पाऊस झाल्याने प्रवासादरम्यान पाणीसाठा निर्माण झालेल्या ठिकाणीही हे पक्षी थांबत आहेत. नैसर्गिक वातावरण चांगले झाल्यानंतर स्थलांतरित पक्षी येतील.
- संजय भिसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, जायकवाडी पक्षी अभयारण्य, पैठण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flamingos Arrival Delay, Jayakwadi Bird Sanctuary Paithan