हिंगोलीत गरजूंसाठी मदतीचा ओघ सुरूच

सकाळ वृत्तसेवा
Friday, 24 April 2020

हिंगोली शहरातील दानशूर व्यक्‍तींमार्फत २७ हजार १८० किलो धान्यसामुग्री आणि एक लाख ५२ हजार शंभर रुपयांच्या धनादेशासह ६१ हजार रुपये रोख रक्‍कम जमा झाली आहे. जमा झालेले धान्य शहरातील गरजूंना वाटप करण्यात आले आहे.

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिकेतर्फे स्थापन केलेल्या मदत केंद्राच्या माध्यमातून शहरातील दानशूर व्यक्‍तींमार्फत २७ हजार १८० किलो धान्यसामुग्री आणि एक लाख ५२ हजार शंभर रुपयांच्या धनादेशासह ६१ हजार रुपये रोख रक्‍कम जमा झाली आहे. संकलित झालेल्या धान्यसामग्रीचे एक हजार ६११ गरजूंना वाटप केल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरू आहे. त्यामुळे शहरातील गोरगरीब, हातावर पोट असलेल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे नगरपालिकेने पुढाकार घेत मदत संकलन केंद्र स्थापन करून दानशूरांना मदतीचे आवाहन केले होते. 

हेही वाचालॉकडाउनमध्ये चार हजार मजुरांना ‘रोहयो’चा आधार...कोठे वाचा

२७ हजार १८० किलो धान्यसामुग्री

त्‍यानुसार या मदत केंद्रात दोन हजार ५५५ किलो गहू, आठ हजार ५०० किलो गव्हाचे पीठ, आठ हजार ६९५ किलो तांदूळ, दोन हजार १६५ किलो खाद्यतेल, ८९० किलो धनादाळ, एक हजार ८१० किलो तूरडाळ, एक हजार ४१० किलो मीठ, ६४ किलो हळद, एक हजार ५० किलो साखर, मिरचीपूड ४१ किलो, असे एकूण २७ हजार १८० किलो धान्यसामुग्री जमा झाली.

धान्य शहरातील गरजूंना वाटप

 तसेच एक लाख ५२ हजार शंभर रुपयांचे धनादेश आणि ६१ हजार रुपये रोख रक्‍कम शहरातील दानशूर व्यक्‍तींमार्फत मदत संकलन केंद्रात प्राप्त झाली आहे. धनादेशाद्वारे संकलित झालेला मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आला आहे. संकलित झालेले धान्य शहरातील गरजूंना वाटप केले जात आहे. 

एक हजार ६११ जणांचा वाटप

शहरातील दिव्यांग, सफाई कामगार, आशा हेल्‍थकेअर, एचआयव्ही ग्रस्‍त, सायकल रिक्षाचालक व हातगाडेवाले, मोची, घरकाम करणाऱ्या महिला, मजूरदार, होमगार्ड जवान, पेपर वाटप करणारे, तृतीयपंथी, निराधार वृद्ध, अशा एक हजार ६११ जणांचा पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक किलो खाद्यतेल, मिरचीपूड शंभर ग्राम, ५० ग्राम हळद, एक हॅडवाश, एक साबन आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.

५२ परप्रातीय कुटुंबीयांनाही मदत

तसेच जिल्ह्यात अडकलेल्या ५२ परप्रातीय कुटुंबीयांनाही मदत करण्यात आली. यात उतरप्रदेश, बिहार, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील ५२ कुटुंबीयांना तीन हजार ५६ किलो धान्यसामुग्रीचे वाटप करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिली.

येथे क्लिक करातलावात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू...कोठे ते वाचा

औंढा नागनाथ संस्‍थानतर्फे गरजूंना मदत

कळमनुरी : औंढा नागनाथ देवस्थानकडून शहरतील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे शुक्रवारी (ता.२४) नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे व नगरसेवकांच्या माध्यमांमधून वाटप करण्यात आले.
त्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला गव्हाचे पीठ, तांदूळ, खाद्यतेल, तूर, मूगडाळ, चहापत्ती, मीठ पुडा, मिरची पाकीट, साबण, आदीचा समावेश होता. 

आमदार संतोष बांगर यांचा पुढाकार 

कळमनुरी येथे ५०० किट येथे उपलब्ध करून देण्यासाठी आमदार संतोष बांगर यांनी पुढाकार घेतला. या वेळी नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, नगरसेवक अप्पाराव शिंदे, दादाराव डुरे, संतोष सारडा, राजू संगेकर, संभाजी सोनुने, सुहास पाटील, अतुल बुरसे, नामदेव कराळे, बाळू पारवे, चंद्रकांत देशमुख यांच्या गरजूंची यादी तयार करून त्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The flow of aid to the needy in Hingoli continues Hingoli news