तलावात बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू...कोठे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 April 2020

नागेशवाडी येथील दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्‍यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता घडली. घटनास्थळी हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी भेट दिली. सायंकाळी दोन्ही भावंडांवर त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. 

औंढा नागनाथ (जि. हिंगोली):  तालुक्यातील नागेशवाडी येथील दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्‍यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

औंढा तालुक्‍यातील नागेशवाडी येथील गणेश नाईक हे कुटुंबीयांसह शेतातच राहतात. त्यांची शेती परिसरातील तळ्यालगत असून बाजूलाच आखाडा आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता सर्जेराव गणेश नाईक (वय १२) व ध्रुपत गणेश नाईक (वय सात) ही दोन मुले पोहण्यासाठी तलावात उतरली.

हेही वाचाहिंगोलीत ११२ जणांना पालिकेचा दणका...कशासाठी वाचा

दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न

 मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघेही पाण्यात बुडाले. दोघे पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली व दोघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. 

गावात होतेय हळहळ व्यक्त

दरम्यान, दोन्ही भावंडांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्‍छेदन करण्यात आले. घटनास्थळी हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे यांनी भेट दिली. सायंकाळी दोन्ही भावंडांवर त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्‍यान, गणेश नाईक यांना दोनच मुले होती. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लॉकडाउनमध्ये वाळू माफियांची चांदी

कळमनुरी : येथील तहसील कार्यालयाच्या पथकाने बुधवारी (ता. २२) अनधिकृत वाळू उपसा करणारी दोन वाहने व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. या वेळी वाहनधारक व त्याच्या साथीदारांनी पथकासोबत हुज्जत घातल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाळू चोरीस आळा घालण्यासाठी पथके

कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे गौण खनिज चोरी व वाहतूक करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे गौण खनिज चोरी प्रकरणास आळा घालण्यासाठी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी पथक स्थापन केले. त्यानुसार या पथकाने मागील दोन दिवसांत तीन वाहनधारकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

मसोड येथे ट्रॅक्टर पकडले

 त्यानंतर बुधवारी मंडळ अधिकारी आनंदराव सुळे, तलाठी गंगाधर पाखरे, संगमेश्वर सोनटक्के, संभाजी होनमाने, अमोल पतंगे यांच्या पथकाने मसोड येथे ट्रॅक्टरमधून अनधिकृतपणे मुरूम नेत असल्याप्रकरणी शेख मुख्तार शेख उस्मान यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एमएच ३८ - व्ही २८५६) ताब्यात घेतले.

पथकासोबत हुज्जत 

 त्याच्याविरुद्ध एक लाख १६ हजार रुपयाची दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. तसेच सांडस येथील ओढ्यावरील वाळू वाहतूक करणारे शेख पाशा अब्दुल अजीज यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर व बाबळी येथील (एमएच ०४ - डीएस ७४७२) हे पीकअप वाहन ताब्यात घेतले. या वेळी वाहन मालक अमन सिद्दिकी व त्याच्या काही साथीदारांनी पथकासोबत हुज्जत घातली. 

येथे क्लिक कराऊसतोड कामगारांच्या धर्तीवर शेतमजुरांबाबत निर्णय घ्यावा: खासदार राजीव सातव

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वाळू वाहतूक करणाऱ्या दोन्ही वाहन मालकाविरुद्ध एक लाख पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई प्रस्तावित केली आहे. तसेच पथकासोबत हुज्जत घातल्याप्रकरणी अमन सिद्दिकी व मोहम्मद असलम जकी यांच्या विरोधात मंडळ अधिकारी श्री. सुळे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वारंगा फाटा येथे टिप्पर पकडले

वारंगाफाटा : कळमनुरी तालुक्‍यातील वारंगाफाटा येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे टिप्पर (एमएच ०४ - एच ४१८२) बुधवारी (ता.२२) पकडण्यात आले. यामध्ये अंदाजे दोन ब्रास वाळू होती. तलाठी एस. जे. शेवाळकर यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number of brothers drowned in the lake ... read where Hingoli news