लॉकडाउनमध्ये चार हजार मजुरांना ‘रोहयो’चा आधार...कोठे वाचा

राजेश दारव्हेकर
Thursday, 23 April 2020

हिंगोली जिल्ह्यातील चार हजार २०५ मजुरांच्या हाताला ‘रोहयो’ची कामे उपलब्ध झाली आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर एक हजार ५४ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली असून ही कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

हिंगोली : जिल्‍ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत दीडशे ग्रामपंचायतींमध्ये ४६७ कामांना सुरवात झाली आहे. यातून गुरवार (ता. २३) अखेर चार हजार २०५ मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध झाली आहेत. तसेच ग्रामपंचायत स्तरावर एक हजार ५४ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली असून ही कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.

जिल्‍ह्यात लॉकडाउन सुरू असून विविध कामे ठप्प पडली आहेत. दुसऱ्या टप्प्यात काही कामांना शिथिलता देण्यात आली. त्यामुळे रोजगार हमी, जलसंधारण व टंचाई निवारणाची कामे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार स्थलांतरीत मजुरांच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात तातडीने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

हेही वाचाहिंगोलीत ११२ जणांना पालिकेचा दणका...कशासाठी वाचा

विविध कामांचा समावेश

सोशल डिस्टन्स पाळत जिल्ह्यातील १५० ग्रामपंचायतींतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये रोपवाटिका, सिंचन विहीर, सार्वजनिक सिंचन विहीर, बिहार पॅटर्नची कामे, बांधावर वृक्ष लागवड, घरकुल योजना, तसेच रस्ता दुतर्फा वृक्षलागवड आदी कामांचा समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामेही सुरू झाली आहेत. 

१४ ग्रामपंचायतींतर्गत ४३ कामे 

त्यानुसार १५० ग्रामपंचायतींतर्गत चार हजार २०५ मजुरांच्या हाताला कामे उपलब्ध झाली आहेत. औढा तालुक्‍यातील १४ ग्रामपंचायतींतर्गत ४३ कामे सुरू असून यावर ३०३ मजूर कामे करीत आहेत. वसमत तालुक्‍यातील ४२ ग्रामपंचायतींतर्गत १५१ कामांवर एक हजार ३७६ मजूर, हिंगोली तालुक्‍यातील ४२ ग्रामपंचायतींतर्गत १५० कामांवर एक हजार ७३५ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

मजुरांनाही दिलासा मिळाला

 कळमनुरी तालुक्‍यातील २४ ग्रामपंचायतींतर्गत ७३ कामांवर ३५१ मजूर, सेनगाव तालुक्‍यातील २८ ग्रामपंचायतींतर्गत ५० कामांवर ४४० मजूर कामे करीत आहेत. लॉकडाउनमध्ये मजुरांची उपासमार होऊ नये यासाठी आणखी कामांचे प्रस्ताव सादर करून कामे सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. दीड महिन्यानंतर लॉकडाउनमध्ये रोजगार हमी योजनेची कामे सुरू झाल्याने मजुरांनाही दिलासा मिळाला आहे.

येथे क्लिक कराऊसतोड कामगारांच्या धर्तीवर शेतमजुरांबाबत निर्णय घ्यावा: खासदार राजीव सातव

मजुरांची नियमित होतेय तपासणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘राहेयो’ची कामे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी रोहयो कामगारांच्या नाव, संपर्क पता आदींची नोंद घेतली जात आहे. तसेच कामगारांच्या तोंडाला मास्‍क लावणे, दोन कामगारांत एक मीटरचे अंतर ठेवणे, दररोज कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करणे, कामगारांसाठी सॅनिटायझरची व्यवस्‍था करणे, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे वेळोवेळी काटेकोरपणे पालन करणे, गर्दी न करणे आदी अटींचे पालन करणे बंधनकारत करण्यात आले आहे. तसेच कोरोना असलेल्या भागातून कामगाराची ने-आण करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

नियमाप्रमाणे कामे करण्याचा सूचना 

वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे लॉकडाउनमध्ये मजुरांची उपासमार होणार नाही, यासाठी जिल्‍ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत १५० ग्रामपंचायतींमध्ये ४६७ कामे आहेत. यातून चार हजार २०५ मजुरांच्या हाताला कामे मिळाली आहेत. तसेच अटी व नियमाप्रमाणे कामे करण्याचा सूचना दिल्या आहेत. आणखी कामांचे प्रस्ताव सादर करून कामे सुरू केली जाणार आहेत. यासाठी सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे.
-रुचेश जयवंशी, जिल्‍हाधिकारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohyo's support for 4,000 workers in lockdown ... read where Hingoli news