file photo
file photo

१५ हजार ६९८ शेतकऱ्यांना वीज देण्याचे लक्ष निर्धारीत

नांदेड : राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा याकरिता शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा मिळावा या उद्देशाने राज्यातील कृषिपंपांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी प्रथमच राबविण्यात येत असलेल्या उच्च दाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) योजनेअंतर्गत नांदेड परिमंडळातील सहा हजार ९४ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

उच्च दाब वितरण प्रणाली या योजनेअंतर्गत एका रोहित्रावर जास्तीत जास्त दोन किंवा तीन कृषिपंपाना वीज जोडणी देणार असल्याने रोहित्राच्या अती भारामुळे सतत विद्युतपुरवठा खंडित होण्याच्या कटकटीतून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. या योजनेअंतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांना वीजजोडणी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. या अनुषंगाने राज्यस्तरावर पाहणी करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली आहे.

१५ हजार ६९८ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे लक्ष

नांदेड परिमंडळांतर्गत ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित वीज जोडणी असलेल्या १५ हजार ६९८ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे लक्ष निर्धारीत केले आहे. त्यापैकी नांदेड जिल्ह्यातील सहा हजार ६३२ तर परभणी जिल्ह्यातील तीन हजार ९६३ तसेच हिंगोली जिल्ह्यातील पाच हजार १०३ कृषीपंपाचा यात समावेश आहे. त्यापैकी आजपर्यंत नांदेड जिल्ह्यातील एक हजार ७०६ परभणी जिल्ह्यातील एक हजार ७७६ तसेच हिंगोली जिल्ह्यातील दोन हजार ६१२ कृषीपंपाना उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत वीज जोडणी देऊन दर्जेदार वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे.

१० केव्हीए १६ व २५ केव्हीए क्षमतेची १३ हजार ६२१ रोहित्रे 

नांदेड परिमंडळात उच्चदाब वीज वितरण प्रणाली योजनेची कामे त्वरीत पुर्ण करण्याकरिता कार्यादेश देण्यात आले आहेत. तसेच या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने १० केव्हीए १६ व २५ केव्हीए क्षमतेची १३ हजार ६२१ रोहित्रे लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत सुरूवातीला थोडा विलंब झाला आहे. मात्र राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू आहेत. येत्या काही दिवसात या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.

उच्चदाब वितरण प्रणालीचे फायदे

सध्या ६३ ते १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून २० ते २५ कृषिपंपांसाठी विद्युतपुरवठा केला जातो. तसेच आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे विजेचा दाब वाढून रोहित्र जळण्याचे प्रमाणही जास्त आहे. याउलट उच्चदाब वितरण प्रणालीत एका रोहीत्रावर एक किंवा दोनच कृषीपंपाना वीज जोडणी देण्याचे धोरण असल्याने रोहीत्र अतिभारित होण्याचा प्रश्नच निकाली निघून कृषीपंपांना उच्च दाबाने म्हणजे ११ हजार व्होल्टने वीज पुरवठा करण्यात येतो.

विजेची तांत्रिक हानी कमी होईल

शिवाय शेतकऱ्यांना स्वतंत्र रोहित्र दिल्याने स्वामित्वाची भावना वाढीस लागून रोहीत्राची निगाही राखल्या जाते. परिणामी रोहीत्र जळण्याचे प्रमाणही शुन्य होते. याउलट वीज चोरीसाठी या प्रणालीत संधीच नसल्याने महावितरणची विजेची तांत्रिक हानी कमी होईल. तसेच या योजनेत ज्या शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यासाठी ०.४ कि. मी. पेक्षा अधिक उच्चदाब वाहिनी टाकावी लागणार आहे किंवा जोडणीसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लागणार आहे, अशा शेतकऱ्यांना 'ऑफ ग्रीड सोलर सिस्टीम'द्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com