मल्टिप्लेक्सचालकांचा आडमुठेपणा जाईना!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - एक ऑगस्टपासून राज्यातील सर्व मल्टिप्लेक्‍स, चित्रपटगृहांमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील, असे आदेश ग्राहक संरक्षण राज्यमंत्र्यांनी दिले खरे; मात्र शहरातील चित्रपटगृहांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. ग्राहकांना खाद्यपदार्थ सोबत नेण्यास मज्जाव करण्याबरोबरच आतील कॅन्टीनमध्ये महागड्या दराने पदार्थ विकण्यात आल्याचे दिसून आले. 

राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास मल्टिप्लेक्‍स चालक मनाई करतात. त्यांच्या कॅन्टीनमध्ये अवाच्या सव्वा दराने पदार्थ आणि शीतपेये विकली जातात. मिनरल वॉटरची बाटली अक्षरशः पन्नास रुपयांना मिळते. प्रेक्षकांची ही लूट थांबवण्यासाठी दाखल याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयानेही हे निर्बंध अयोग्य ठरवले. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उपरोक्त आदेश दिला होता. 

एक ऑगस्टपासून अंमलबजावणीचे आदेश असतानाही शहरातील सर्वच चित्रपटगृहांमध्ये त्याच्या उलट चित्र दिसून आले. गुरुवारी (ता. दोन) शहरातील चित्रपटगृहांची पाहणी केली असता, प्रेक्षकांनी सोबत आणलेले खाद्यपदार्थ त्यांना सोबत नेऊ न देता चेकिंग काउंटरवरच एका डब्यात टाकले जात होते. त्याचबरोबर खाद्यपदार्थ आतील कॅन्टीनमधूनच घेण्याबाबत दम भरला जात होता. 

याबाबत विचारणा केली असता, शासननिर्णय आला नसल्याचे कारण पुढे केले. मल्टीप्लेक्‍स चालकांच्या या मुजोरीचा सामान्य प्रेक्षकांना भुर्दंड बसत असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत होती.

चित्रपट बघताना काहीतरी खाण्याची इच्छा होतेच. मात्र, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ सोबत आणू दिले जात नाहीत. तेथील कॅन्टीनमध्ये असलेल्या पदार्थांची किंमत तिपटीने महाग आहे. यामुळे ही मुजोरी आता थांबवावी.
- आकाश कंटक, प्रेक्षक

शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. परंतु चित्रपटगृहे त्याचे पालन करत नाहीत. या भांडणात प्रेक्षकांचे नुकसान होते. त्यामुळे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी.
- कोमल जाधव, प्रेक्षक

Web Title: Food Multiplex owner