
औसा (लातूर) : महाशिवरात्रीला शुक्रवारी (ता.२१) याकतपुर गावातील लोकांनी उपवासाची भगर आणि साबुदाणा खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली असून, अत्यवस्थ सहा रुग्णावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आणखी कांही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने एक वैद्यकीय पथक याकतपुर गावात दाखल झाले आहे. या पथकाद्वारे गावातच रुग्णावर उपचार केले जात आहेत.
कुठं सापडलं जळालेल्या अवस्थेतलं प्रेत...
गावातीलच एका किराणा दुकानातून ही भगर या लोकांनी खरेदी केली होती. या भगर आणि साबुदाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते प्रयोग शाळेत पाठविले जाणार आहेत. रुग्णांचा आकडा सध्या तरी सतरा सांगण्यात येत असला तरी हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
याकतपुर (ता. औसा) या गावात महाशिवरात्रीचा उपवास असल्याने अनेक लोकांनी गावातीलच किराणा दुकानातून भगर आणि साबुदाणा खरेदी करून तो खाल्ला. थोड्या वेळाने त्यांना मळमळ, चक्कर, जुलाब आणि उलट्या सुरू झाल्या.
त्यामुळे बब्रुवाहन दिनकर लोखंडे (४९), नंदाबाई बब्रुवाहन लोखंडे (४८), बाळू बब्रुवाहन लोखंडे (२६), अक्षता बाळू लोखंडे (७) या एकाच कुटुंबातील चार व्यक्तीना तर मंगल मुरलीधर चव्हाण (५२), सत्यभामा भास्कर मोरे (४५) यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यांच्या व्यतिरिक्त गावातील सोनाली दत्ता औटी (२५), वीरभद्र बब्रुवाहन लोखंडे (२३), मंगल लक्ष्मण चव्हाण (२२), प्राजक्ता बाळू लोखंडे (२०), गंगासागर सूर्यकांत गवळी (१८), बन्सी भास्कर मोरे (२७), लक्ष्मी बालाजी माने (१८), अश्विनी सूर्यकांत गवळी (१५), व्यंकट बाजीराव मोरे (७०), नम्रता गोविंद मोरे (२२), मनीषा अशोक गवळी(३८) यांच्यापैकी कांहीवर खाजगी रुग्णालयात तर कांहीवर वैदयकीय पथकाद्वारे उपचार केले जात आहेत.
दरम्यान भगर आणि साबुदाण्याचे नमुने वैदयकीय पथकांनी घेतले असून याला अन्न व औषधी प्रशासनाकडे प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.