महापौरपदाची ‘काँग्रेस’ची औपचारिकता 

file photo
file photo

परभणी : महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाने आपली बाजू भक्कम केली असून महापौर म्हणून अनिता रवींद्र सोनकांबळे, तर उपमहापौर म्हणून भगवान वाघमारे यांच्या निवडीची केवळ औपचारिकता राहिल्याचे चित्र आहे.

काँग्रेस पक्ष निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच प्रयत्नशील असून अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माघार घेण्याची शक्यता नाकारता नाही. तर भाजपचे उमेदवार माघार न घेता निवडणूक लढविण्याचे संकेत मिळत आहे. शिवसेनेने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. बी. रघुनाथ सभागृहात शुक्रवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता महापौर व उपमहापौरपदाच्या निवड प्रक्रियेस सुरवात होणार आहे. महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून या पदासाठी अनिता रवींद्र सोनकांबळे (काँग्रेस), डॉ. वर्षा संजय खिल्लारे (राष्ट्रवादी), मंगला अनिल मुदगलकर (भाजप), श्रीमती गवळण रामचंद्र रोडे (राष्ट्रवादी) यांनी, तर उपमहापौरपदासाठी भगवान वाघमारे (काँग्रेस), खान महेमूद अब्दुल मजिद (काँग्रेस), एसएमएस अली पाशा (राष्ट्रवादी), अलीखान मोईनखान (राष्ट्रवादी) व मोकिंद खिल्लारे (भाजप) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

‘काँग्रेस’ ची भक्कम मोर्चेबांधणी
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, सभागृह नेते भगवान वाघमारे यांनी भक्कम मोर्चेबांधणी करत न कुणाशी आघाडी केली, न कुणाला सोबत घेतले. उलटपक्षी संख्याबळाची भक्कम तरतूददेखील करून ठेवली. आपल्या व समर्थक अशा संख्याबळापेक्षा अधिक सदस्यांना सहलीवर पाठविले. पक्षातील उपमहापौरपदासाठी होत असलेली रस्सीखेच टाळण्यासाठी सर्वसंमतीचे उमेदवार म्हणून भगवान वाघमारे यांची उमेदवारी दाखल केली. तिथेच ही लढत एकतर्फी झाली. अन्य काही पक्षीयांनीदेखील त्यांना पाठबळ दिले. त्यामुळे निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महापौर म्हणून अनिता सोनकांबळे व उपमहापौर म्हणून भगवान वाघमारे यांच्या नावाची घोषणा होण्यासाठी औपचारिकता शिल्लक असल्याचे दिसून येते. काँग्रेसकडून उपमहापौपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले खान महेमूद अब्दुल मजिद हे माघार घेणार असल्याचे स्पष्ट आहे.

राष्ट्रवादीची उमेदवार माघारीची शक्यता
राष्ट्रवादीकडूनदेखील महापौरपदासाठी दोन व उपमहापौरपदासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीचे १९ सदस्य आहेत. संख्याबळासाठी थोडेफार प्रयत्न झाले. परंतु, अपेक्षित संख्या होत नसल्याने राष्ट्रवादी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शुक्रवारी कदाचीत राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतात. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आहे, मग विरोधात का लढायचे? असा सूरदेखील काही सदस्यांतून उमटत आहे. माघार जरी घेतली, तरी ते काँग्रेसला मतदान करतात, की तटस्थ राहतात? हे सभागृहात दिसून येणार आहे. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेतेपद मात्र कायम राहणार असल्याचे बोलले जाते. पुढे चालून काही सत्तेची पदेदेखील त्यांना मिळू शकतात.

भाजप निवडणुकीच्या रिंगणात ?
भारतीय जनता पक्षाचे आठ सदस्य असून त्यांनी दोनही पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यपातळीवरचे राजकारण पाहता
यापक्षाचे दोनही उमेदवार निवडणूक लढवण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध भाजप अशी निवडणूक होऊ शकते. त्यामुळे काँग्रेसच्या बिनविरोधच्या प्रयत्नांना खीळ बसू शकते.

शिवसेनेची भूमिका अद्यापही अस्पष्ट
महापालिकेत शिवसेनेचे पाच सदस्य असून या पक्षाची भूमिका स्पष्ट नाही. नेहमीप्रमाणे ते सभागृहात तटस्थ राहतात, की अनुपस्थितीत राहतात? हे सभागृहातच स्पष्ट होईल. राज्यात महाशिवआघाडी आकारात येत असतांना इथेदेखील काँग्रेससोबत जाऊन मतदान करणार का? हेदेखील सभागृहात स्पष्ट होईल.

 


सहलीवरील सदस्य सभागृहातच होणार दाखल
काँग्रेससह अन्य काही पक्षांचे सहलीवर गेलेले सदस्य रात्री उशिरापर्यंत परतणार आहेत. तर काही जण आले आहेत. त्यांची एकत्रित व्यवस्था येथेदेखील करण्यात आली असून ते शुक्रवारी (ता.२२) थेट सभागृहातच दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परभणी महापालिकेच्या महौपर-उपमहापौरपदासाठी शुक्रवारी (ता. २२) सकाळी ११ वाजता बी. रघुनाथ सभागृहात निवडणूक होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नियुक्ती केली असल्याची माहिती नगरसचिव विकास रत्नपारखे यांनी दिली.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com