कॉंग्रेसचे माजी आमदार नितीन पाटील भाजपमध्ये

प्रकाश बनकर
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

कॉंग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन सुरेश पाटील यांनी दोन संचालक, इतर कार्यकर्त्यांसह  विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.

औरंगाबाद: कॉंग्रेसचे माजी आमदार तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन सुरेश पाटील यांनी दोन संचालक, इतर कार्यकर्त्यांसह शुक्रवारी (ता.4) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांचे वडील सुरेश पाटील कॉंग्रेसचे निष्ठावंत होते. जिल्हा बॅंकेतील विविध घोटाळ्यांची शासनस्तरावर सुरू असलेली चौकशी रोखण्यासाठी नितीन पाटील यांनी हे पाऊल उचलले असल्याचे तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. 

नितीन पाटील यांच्यासह जिल्हा बॅंकेचे संचालक जावेद शब्बीर पटेल, संचालक शांतिलाल छापरवाल, कन्नडचे खरेदी-विक्री संघाचे सभापती सुरेश डोळस, महेगावचे सरपंच पाडुरंग घुगे, डॉ. प्रकाश चव्हाण, भगवान काजे, साखरवेलचे सरपंच देवेन घुगे, कैलास आकोलकर, योगेश खैरनार, राहुल राठोड, प्रवीण गर्जे पाटील, प्रवीण पाटील यांनी प्रवेश केला. 

जिल्हा बॅंकेतील घोटाळे दबणार? 

स्थापनेपासून प्रथमच बॅंकेवरील कॉंग्रेसचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. राज्य सहकारी बॅंकेतील 25 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून संचालक मंडळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य बॅंकेचे संचालक या नात्याने नितीन पाटील यांचाही पोलिसांनी आरोपींत समावेश केला आहे. जिल्हा बॅंकेतील पायलट ऊस विकास योजनेत साडेतीन कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विहीर तसेच विद्युत मोटार नसणाऱ्यांना उसाच्या नावाखाली कर्ज देण्यात आले होते. विक्री केलेल्या जमिनींवर काही महाभागांनी कर्जे मिळविली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, नितीन पाटील हे संशयित आरोपी आहेत. जिल्हा बॅंकेतील नोकर भरती घोटाळ्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. साडेआठ कोटी रुपयांचे सहकारी संस्थांचे कर्ज माफ केल्याच्या प्रकरणात पाटील यांच्यासह काही संचालकांवर क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Congress MLA Nitin Patil in BJP