सीताफळातून मिळतोय आर्थिक समृद्धीचा मार्ग, सेवानिवृत्त शिक्षकाने कल्पकतेतून निवडला पर्याय

अविनाश काळे
Monday, 30 November 2020

डोंगर, दऱ्यात पिकणाऱ्या गावरान सीताफळाला मिळणारी बाजारपेठ ही फारशी फायदेशीर ठरत नाही. मात्र आधुनिक पद्धतीने आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळाच्या बागेतून मिळणारे उत्पन्न साधारणतः चाळीस वर्षापर्यंत मिळते.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : डोंगर, दऱ्यात पिकणाऱ्या गावरान सीताफळाला मिळणारी बाजारपेठ ही फारशी फायदेशीर ठरत नाही. मात्र आधुनिक पद्धतीने आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळाच्या बागेतून मिळणारे उत्पन्न साधारणतः चाळीस वर्षापर्यंत मिळते. शिवाय चांगली बाजारपेठही मिळते. यासाठी नियमित देखरेख आणि मेहनत महत्त्वाची आहे. तालुक्यातील कदेर येथील सेवानिवृत्त शिक्षक आर. व्ही. गायकवाड यांनी सीताफळाच्या बागेचा यशस्वी प्रयोग करून अडीच वर्षानंतर सुरूवात झालेल्या पहिल्या फळविक्रीला सुरूवात केली आहे. दरम्यान अतिवृष्टीने एक एकर बाग भूईसपाट झाली. मात्र पाच एकर क्षेत्रातील सीताफळांच्या झाडांनी तग धरून शेतकऱ्यांच्या मेहनतीला फळ उपलब्ध करून दिले आहे.

पारंपरिक पिकाबरोबरच बागायतीचे उत्पन्न घेण्याचा निश्चय करून सेवानिवृत्तीनंतर श्री.गायकवाड यांनी सीताफळाच्या बागेचा सखोल अभ्यास केला. २५ जुन २०१८ च्या दरम्यान सहा एकर क्षेत्रात एन.एम.के. सुपर गोल्ड वाणाच्या सीताफळाचे एक हजार ७५० रोपांची दहा बाय पंधरा फुट अंतरावर लागवड केली. रोप, लागवड खर्च व ट्रीप यासाठी एक लाखाचा खर्च आला. यासाठी शेणखताचा आणि जीवामृताचा वापर केला गेला. अडीच वर्षापर्यंत एका रोपाला तीन दिवसाआड एक लिटर पाणी उन्हाळा आणि हिवाळ्यात दिले गेले. अडीच वर्षानंतर डिसेंबर ते जुनपर्यंत बागेला पाण्याचा एकही थेंब द्यायचा नसतो. त्यामुळे पानगळ होते आणि पुन्हा नव्या जोमाने फुटवा सुरू होतो. त्यानंतर फुल, फळधारणा सुरू होते. तीन वर्षांत प्रत्येकी सहा महिन्याला झाडांची कटिंग करणे आवश्यक असते.

साधारणतः अडीच वर्षानंतर प्रत्यक्षात फळधारणा सुरू होते. सध्या श्री. गायकवाड यांच्या बागेत सीताफळ विक्रीसाठी तयार आहेत. मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीने फळधारणेवर परिणाम झाला, तरीही येणारा चाळीस वर्षांचा काळ उत्पन्नासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

अडीच वर्षांपर्यंत आंतरपिकाची संधी
अडीच वर्षांपर्यंत बागेत पारंपरिक आंतरपिकाचे उत्पन्न घेता येते. श्री. गायकवाड यांनी सहा एकरात सोयाबीन व हरभऱ्याचे दोन वेळा उत्पन्न घेतले. त्यातून त्यांना जवळपास दोन लाखांचा फायदा मिळाला. सध्या हरभरा व गव्हाचे आंतरपिक असून त्यातूनही एक लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे.

अतिवृष्टीनंतरही उभारी घेतली बाग !
श्री.गायकवाड यांचे शेत बेन्नीतुरा नदीकाठी असल्याने गेल्या महिन्यात अतिवृष्टीचा फटका बसल्याने सीताफळाच्या बाग पाण्याखाली गेली. एक एकर बागेतील फळझाडांचे नुकसान झाले. पण पाच एकर क्षेत्रातील झाडे तग धरली. त्याला उभारी देण्यासाठी मेहनत घेतली. सध्या सीताफळाची प्रतिकिलो शंभर रुपये दराने जागेवर विक्री सुरु आहे. ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून ग्राहक सीताफळाची मागणी करताहेत. आणखी एक महिना फळाचे उत्पन्न सुरू राहिल. त्यातून पन्नास हजाराचे उत्पन्न सहज मिळू शकते, असे श्री.गायकवाड यांनी सांगितले.

 

पारंपरिक पिकाबरोबरच फळबागेला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. एकदा लावा तिन पिढ्या खावा! हा शब्दप्रयोग सीताफळाच्या बागेसाठी महत्त्वाचा आहे. यातून चाळीस वर्षांपर्यंत उत्पन्न मिळते. त्यासाठी मेहनतीचे दक्षता महत्त्वाची आहे. अडीच वर्षानंतर पहिल्या फळासाठी एकरी सरासरी पन्नास हजार, त्यानंतर टप्प्याटप्प्याने एक लाखापासुन चार लाखापर्यंत उत्पन्न मिळू शकते. त्यासाठी बाजारपेठातील दरही महत्त्वाचा असतो. या सीताफळात बिया कमी, गर जास्त असतो. आरोग्यवर्धक फळ म्हणून याची मोठी मागणी असून यापासून रबडी, आईस्क्रीम व चॉकलेट तयार केले जाते. फळबागाची निवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न सुरू असून दोन शेतकरी यंदा सीताफळाची बाग तयार करताहेत याचे समाधान वाटते.
- आर. व्ही. गायकवाड, शेतकरी, कदेर

 

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former Teacher Get Financial Prosperity Through Custered Apple Umarga