लातूर जिल्ह्यात १९ लाख लोकसंख्येची तपासणी; क्षयरोग, कुष्ठरोग मोहीम

हरी तुगावकर
Monday, 30 November 2020

लातूर जिल्ह्यात ता. एक ते १६ डिसेंबर या कालावधित क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करून तपासणी करण्यात येणार आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यात ता. एक ते १६ डिसेंबर या कालावधित क्षयरोग व कुष्ठरोग रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १९ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण करून तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने एक हजार ८५३ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जाणार आहे.

या मोहिमेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून ता. १ ते १६ डिसेंबर या कालावधित जिल्ह्यात क्षयरोग कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील शंभर टक्के तर शहरी भागातील ३० टक्के नागरिकांचा यात घरोघर जाऊन सर्वे करण्यात येणार आहे. यामध्ये एक महिला व एक पुरुष स्वयंसेवकाच्या माध्यमातून शारीरिक तपासणी केली जाणार आहे. लक्षणे आढळणाऱ्या संशयित रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा तपासणी केली जाणार आहे. रुग्ण आढळून आल्यास त्यांच्यावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत.

या मोहिमेत आरोग्य विभागाच्या वतीने दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, ताप असणे, वजनात घट होणे, थुंकीवाटे रक्त जाणे, मानेवर गाठ असणे अशी लक्षणे आढळून आल्यास संशयित म्हणून नोंद घेण्यात येणार आहे. अशा व्यक्तींच्या सर्व तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहे. रोगाची लक्षणे अंगावर चट्टे, हाता पायाला मुंग्या येणे, स्नायुमध्ये अशक्तपणा येणे, बधिरता येणे, भुवयाचे केस विरळ होणे, चेहरा तेलकट होणे, तळहात तळपायाला बधीरता जाणवणे अशी लक्षणे असणाऱ्यांची पुन्हा एकदा तपासणी करून त्यांच्या मोफत उपचार केले जाणार आहेत.

या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये १ हजार ८५३ आरोग्य पथक नियुक्त करण्यात आली आहेत. ते १९ लाख ७ हजार ३४२ लोकसंख्येचे सर्वेक्षण करून तपासणी करणार आहेत. या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, जिल्हा क्षय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक हेमंत कुमार बोरसे, डॉ. राहुल आनेराव, डॉ. अल्का परगे यांनी केले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ninteen Lakh Population Health Check Up Complete In Latur District