
जालना शहरातील लोधी मोहल्ला येथील चार मुलींचे बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
जालना : शहरातील लोधी मोहल्ला येथील चार मुलींचे बालविवाह रोखण्यात यश आले आहे. ही कामगिरी दामिनी पथकासह महिला बाल कल्याण समिती व चाईल्ड लाईन यांनी संयुक्तरित्या केली आहे.जालना शहरातील लोधी मोहल्ला भागातील एका १४ वर्षीय मुलीचा ता.८ डिसेंबरला कुटुंबीय विवाह करणार असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दामिनी पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, महिला बाल कल्याण समिती सदस्य व चाईल्ड लाईन सदस्य मुलीच्या घरी गेले. तेथे मुलीचे जन्म प्रमाणपत्र तपासले, मुलीची भेट घेतली व नंतर मुलीच्या व मुलाच्या आई- वडिलांना तसेच घरातील सर्व व्यक्तींना एकत्र करून त्यांना बालविवाह कायद्याबद्दल समुपदेशन केले. त्याच प्रमाणे मुलीचे १८ वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय लग्न करता येणार नाही अशी प्रतिबंधात्मक नोटीस दिली.
दरम्यान या अल्पवयीन मुलीचा विवाह हा सामुदायिक विवाह सोहळ्यात होणार होता. या सोहळ्यात एकूण १७ जोडप्यांचा समावेश आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याचे आयोजकांना व पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांना कल्पना देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर सोहळ्यातील विवाह होणाऱ्या सर्व मुला-मुलींचे वयाचे प्रमाणपत्र काद्राबाद पोलिस चौकीला सादर करण्यास सांगितले. जमा केलेल्या वयाचे प्रमाणपत्र पल्लवी जाधव यांनी तपासले. तेव्हा त्यात आणखी तीन मुली या अल्पवयीन आढळून आल्या. त्यानुसार लोधी मोहल्ला येथे अल्पवयीन मुलींच्या आई-वडिलांना तसेच तेथील इतर पालकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देवून समुपदेशन केले. हे बालविवाह रोखण्याच्या सूचना देऊन प्रतिबंधात्मक नोटीस दिल्या.
Edited - Ganesh Pitekar