हिंगोली जिल्ह्यात आढळले चार मानवी सांगाडे

जगन्नाथ पुरी
Friday, 29 May 2020

तळणी गावात खड्डा खोदताना चार मानवी सांगाडे आढळून आले आहेत. हे सर्व सांगाडे एका ठिकाणी आणि एका रांगेमध्ये पुरण्यात आले आहेत. झोपलेल्या स्थितीत असलेल्या या सांगाड्याचे हात, पाय, कवटी, छातीच्या फासोळ्या अशी सर्व हाडे चांगल्या स्थितीत आढळून आले.

सेनगाव(जि. हिंगोली) : तालुक्यातील तळणी गावालगत गावठाण जागेत सेंद्रिय खतासाठी खड्डा खोदत असताना ग्रामस्थांना चार मानवी सांगाडे गुरुवारी (ता. २८) सापडले. त्यानंतर हे सर्व सांगाडे जमा करून त्यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. मात्र, हे सांगाडे कधीचे आहेत, कुणाचे आहेत, याची माहिती ग्रामस्थ घेत आहेत.

तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी (ता. २८) धम्मरत्न गवळी, सुमेध खंदारे, गंगाधर वानखेडे, बाळू खंदारे हे गावठाण जागेत सेंद्रिय खत तयार करण्यासाठी खड्डा खोदत होते. सुमारे तीन फूट खोल गेल्यानंतर त्यांना मानवी शरीराचा सांगाडा आढळून आला. 

हेही वाचा तलाठी दुसऱ्यांदा अडकला एसीबीच्या जाळ्यात, कुठे? ते वाचाच

आणखी दोन सांगाडे आढळून आले

झोपलेल्या स्थितीत असलेल्या या सांगाड्याचे हात, पाय, कवटी, छातीच्या फासोळ्या अशी सर्व हाडे चांगल्या स्थितीत आढळून आले. उत्सुकता म्हणून त्यानंतर त्यांनी आजूबाजूला खोदकाम सुरू केले असता त्या ठिकाणी सुद्धा त्यांना दुसरा सांगाडा आढळून आला. ग्रामस्थांनी आणखी आजूबाजूला खोदकाम केले असता त्या ठिकाणीही आणखी दोन सांगाडे आढळून आले. 

सांगाडे कुटुंबातील असण्याची शक्यता

या इतर सांगाड्यांच्या डोक्याची कवटी ते पायाच्या हाडांपर्यंत सर्व हाडे आजही सुरक्षित आहेत. तळणी गावातील बहुतांश तरुण हे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात. त्यामुळे त्यांनी हे सांगाडे पाहिल्यानंतर भीती न बाळगता सर्व सांगाडे जमा केले. येथे आढळून आलेले मृतदेहांचे सांगाडे एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता गावकरी वर्तवत आहेत. 

४० ते ५० वर्षांपूर्वीचे मृतदेह

सर्व सांगाडे एका ठिकाणी आणि एका रांगेमध्ये पुरण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळी देवी, प्लेगसारखे साथरोगाचे आजार असायचे. त्या वेळी एकाच घरातील अनेक व्यक्ती मृत्युमुखी पडत. रोगाची अन्यत्र लागण होऊ नये, दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी मृतदेह जमिनीत खोल खड्डा खोदून पुरून टाकण्यात येत होते. त्यामुळे हे सांगाडे ४० ते ५० वर्षांपूर्वी साथरोगात मृत्यू झालेल्या व्यक्तींची असण्याची शक्यता गावकरी व्यक्त करीत आहेत.

येथे क्लिक कराआता गणनिहाय अधिकारी पुरविणार कोरोनाची माहिती

अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न

शिवाय पावसाळा ऋतू असला की ग्रामीण भागात मृतदेहांना जाळण्यासाठीही खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे मृतदेह पुरून टाकण्याशिवाय पर्याय राहात नव्हता. हे सर्व मृतदेह गावातील एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता असून आज घडीला हे मृतदेह नेमके कोणाच्या घरचे आहेत, याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न गावकरी करीत आहेत.

सांगाडे जमा करून ठेवले

गावातील काही तरुण अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करतात. त्यामुळे या तरुणांना भूत, दैवी शक्तीची अजिबात भीती वाटत नाही. दैवी शक्ती किंवा भूतावर विश्वास ठेवत नाहीत. त्यामुळे हे सर्व सांगाडे जमा करून ठेवले आहेत.
-सुमेध खंदारे (तळणी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four Human Skeletons Found In Hingoli District Hingoli News