आता गणनिहाय अधिकारी पुरविणार कोरोनाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 May 2020

ग्रामीण भागातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याची तातडीने माहिती मिळावी, तसेच आवश्‍यक उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी पंचायत समिती गणनिहाय १०४ समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

हिंगोली : जिल्ह्यात कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वाढती संख्या लक्षात घेता, तातडीने माहिती मिळविणे तसेच आवश्‍यक कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने आता प्रत्येक पंचायत समिती गणासाठी एक समन्वय अधिकारी, अशा सुमारे १०४ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे ‘सीईओ’ राधाबिनोद शर्मा यांनी गुरुवारी (ता. २८) काढले आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, नाशिक, रायगड आदी हॉटस्पॉट भागांतून येणाऱ्या मजुरांमध्येच कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश काढले आहेत. 

हेही वाचा हिंगोलीत हळद अडीच हजारांनी उतरली

१०४ समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

त्यानुसार प्रत्येक गावात आलेल्या मजुरांना तसेच गावकऱ्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. दरम्यान, ग्रामीण भागातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्याची तातडीने माहिती मिळावी, तसेच आवश्‍यक उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी पंचायत समिती गणनिहाय १०४ समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

या वेळी ‘सीईओ’ राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त ‘सीईओ’ डॉ. मिलिंद पोहरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, नितीन दाताळ, गणेश वाघ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डी. के. हिवाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिकारी काम पाहणार आहेत. 

स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त

जिल्हास्तरावर जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून यू. एल, हातमोडे, तालुका स्तरावर हिंगोली सहायक गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, कळमनुरी ए. टी. आंधळे, सेनगाव एम. टी. कोकाटे, औंढा नागनाथ जी. के. पाटील, वसमत बी. टी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच १०४ गणांसाठी स्वतंत्र समन्वय अधिकारी नियुक्त केले असल्याचे ‘सीईओ’ श्री. शर्मा यांनी सांगितले.

येथे क्लिक करा संतापजनक : क्वारंटाइन गरोदर मातेसह मजुरांना मारहाण

गाव पातळीवर लक्ष ठेवावे लागणार

हिंगोली तालुक्यात वीस, औंढा १८, वसमत २४, कळमनुरी २२, सेनगाव तालुक्यातील २० गणात नोडल अधिकारी काम करणार आहेत. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील या बाबत दक्षता घेणे, गाव पातळीवर स्वच्छता व जंतनाशकाची फवारणी करून घेणेआदी कामे पहावी लागणार आहेत. 

झोननुसार सर्वेक्षणाची पाहणी 

 आरोग्य व पंचायत विभागाच्या सर्वेक्षणाच्या बाबी पाहणे, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या संपर्कात राहून उपाययोजना करणे, कोरोना रुग्ण आढळलेल्या ठिकाणी कंटेन्मेंट झोननुसार सर्वेक्षणाची पाहणी करणे. बाहेर जिल्ह्यांतून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवणे आदी कामे या अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now The Enumerator Will Provide Corona Information Hingoli News