‘एसईबीसी’साठी चारशेचा रेट!

राजेभाऊ मोगल
सोमवार, 17 डिसेंबर 2018

औरंगाबाद - मोठ्या संघर्षातून मराठा आरक्षण पदरात पडले. त्याच्या लाभासाठी लागणारे एसईबीसी (सामाजिक, आर्थिक मागास) प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मराठा बांधव शासनदरबारी खेट्या घालत आहेत. दरम्यान, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी दलाल सरसावले आहेत. सेतू केंद्रात प्रवेश करताच काय हवंयं सांगा, लगेच मिळवून देतो, असे सांगत विद्यार्थ्यांना अक्षरश: गराडा घातला जात असल्याचा प्रकार रोज घडत आहे. 

आरक्षणाची अधिसूचना आल्यानंतर राज्यभरात मराठा बांधव एसईबीसी प्रमाणपत्रासाठी सेतूमध्ये रांगा लावत आहेत; येथील जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करताच अनेक दलाल गराडा घालतात. ‘‘सांगा तुम्हाला काय हवंय?’’ आपण ‘‘हे हे प्रमाणपत्र पाहिजे’’ सांगितल्यास लगेच ते रेट सांगू लागतात. विद्यार्थी एकटीच असेल तर पाठलागही करतात. हा प्रकार खुलेआम सुरू असताना त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही. या दलालांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत साटंलोटं आहे की काय, असा संशयही व्यक्‍त होत आहे.

थोड्या वेळातच कसे मिळते प्रमाणपत्र?
पैसे दिल्यास काही वेळातच प्रमाणपत्र मिळवून देतो, असा दावा दलाल करतात. अनेक जण या दलालांकडून प्रमाणपत्र मिळवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हे दलाल रहिवासी प्रमाणपत्रासाठी तीनशे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र साडेतीनशे तर मराठा जात प्रमाणपत्रासाठी चारशे रुपये उकळत आहेत. तसेच हे सर्व एकत्र पाहिजे असल्यास आठशे रुपये पॅकेज समोर ठेवतात.

प्रशासन गप्प का? 
कुठे उभे राहावे, याच्या वाटण्या सेतू सुविधा कार्यालयात दलालांमध्ये झालेल्या आहेत. ‘‘अरे हे गिऱ्हाईक माझे आहे, हा कोपरा माझा आहे’’, असा दावा ही मंडळी करीत असते. ‘‘काही क्षणात काम करून देतो, ’’ असे ते नागरिकांना सांगत असतात. हे संवाद सर्रास ऐकायला मिळत असतानाही प्रशासन गप्प का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: Four hundered rate for SEBC certificate in aurangabad