दोन दुचाकीवरून चार जण आले अन् एसटी बस...  

संजय कापसे
Tuesday, 16 June 2020

मंगळवारी आखाडा बाळापूर येथून प्रवासी घेऊन हिंगोलीकडे ही बस निघाली होती.  सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आराटी पाटीजवळ बस आल्यानंतर समोरून दोन दुचाकींवर आलेल्या चार युवकांनी बसवर दगडफेक करत बसचे नुकसान केले. 

कळमनुरी (जि. हिंगोली) : दुचाकीवरून आलेल्या युवकांनी कळमनुरी आगाराची बस थांबवून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी (ता.१६) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील आराटी पाटीजवळ घडली. बसची तोडफोड करण्याचे कारण मात्र समजू शकले नाही.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कळमनुरी आगाराची बस (एमएच २० बीएल २९०२) कळमनुरी ते हिंगोली मार्गावर चालविण्यात येत होती. मंगळवारी आखाडा बाळापूर येथून प्रवासी घेऊन हिंगोलीकडे ही बस निघाली होती. 

हेही वाचातेराशे रुपयांची लाच घेताना कृषी सहायक जाळ्यात -

दगडफेक करीत लाकडाने बसची तोडफोड 

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आराटी पाटीजवळ बस आल्यानंतर समोरून दोन दुचाकींवर आलेल्या चार युवकांनी बस चालकाला गाडी थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर बसवर दगडफेक करीत लाकडाने बसची तोडफोड केली. 

आखाडा बाळापूरच्या दिशेने पळ काढला

या वेळी गाडीमध्ये चालक खंडोजी लाखाडे व वाहक संतोष नावडे यांच्यासह आठ प्रवासी होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गाडीतील प्रवासी व वाहन चालक हादरून गेले. या वेळी बसच्या समोरील प्रवासी सीटच्या व मागच्या बाजूच्या काचा फोडून विनाक्रमाकाच्या दुचाकीवरून आखाडा बाळापूरच्या दिशेने पळ काढला.

युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न 

या घटनेची माहिती चालक श्री. लाखाडे यांनी कळमनुरी आगार व पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, कर्मचारी गजानन गडदे, प्रकाश इंगोले, पवन चाटसे घटनास्थळी पोचले. त्यांनी त्या युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

 त्यानंतर घटनेचा पंचनामा करून बस पोलिस ठाण्यात आणण्यात आली. या वेळी कळमनुरी आगाराचे गजानन पिंनगाळे, सतीश डुरे यांनी बसची पाहणी केली. चालक खंडोजी लाखाडे यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.

येथे क्लिक करागंभीर प्रकरण, पोलिस उपनिरीक्षकाची निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना चुकीची वागणुक -

दगडफेकीचे कारण अस्पष्ट

कळमनुरी आगाराची बस मंगळवारी आखाडा बाळापूर येथून प्रवासी घेऊन हिंगोलीकडे निघाली होती. आराटी पाटीजवळ अचानक चार जणांनी बसवर दगडफेक केल्याने वाहनचालकांनाही काय झाले हे कळेना. यामध्ये बसचे नुकसान झाले आहे. मात्र, ही दगडफेक का झाली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

औंढ्यात चाळीस हजारांचा गुटखा पकडला

हिंगोली:  राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला ४० हजारांचा गुटखा अन्न विभागाने औंढा नागनाथ येथे पकडला. या बाबत सोमवारी (ता. १५) नोंद घेण्यात आली. राज्य शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मंगळवारी (ता.नऊ) गोविंद टोम्पे (एमएच ३८ ९४४१) या वाहनावरून नेत होता. त्याचेकडून चाळीस हजार पाचशे साठ रुपयांचा गुटखा व वीस हजारांची दुचाकी असा साठ हजार पाचशे साठ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four People Came From Two two-wheelers and ST Bus ... Hingoli News