चार वर्षांच्या मुलाला फेकले नदीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जून 2019

चारवर्षीय चिमुकल्याला पळवून नेऊन त्याचा एका महिलेनेच खून केल्याची घटना बुधवारी (ता. २६) सकाळी शहरात उघडकीस आली.

बीड -  अनैतिक संबंधाच्या संशयातून संबंधित महिलेच्या घरी जाऊन चारवर्षीय चिमुकल्याला पळवून नेऊन त्याचा एका महिलेनेच खून केल्याची घटना बुधवारी (ता. २६) सकाळी शहरात उघडकीस आली. मृत मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिसांनी संशयित महिलेस अटक केली. यावेळी तिने खून केल्याची कबुली दिली. अनैतिक संबंधातून घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

सार्थक विष्णू देवगुडे (वय चार) असे मृत मुलाचे नाव आहे. सार्थक देवगुडे याचे कुटुंब गेवराई तालुक्‍यातील निपाणी येथील असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शहरातील स्वराज्यनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. मृत सार्थकचे वडील भोळसर असून आई अनिता ही धुणीभांडी करून उपजीविका भागवते. अनिता यांना दोन मुले व एक मुलगी असून सार्थक हा सर्वात लहान मुलगा होता. 

श्रीराम शिंदे (रा. कुमशी. ता. बीड) याच्याशी अनिताचे अनैतिक संबंध असल्याचा संशय श्रीरामची पत्नी श्‍यामला ऊर्फ शारदाला होता. सोमवारी (ता. २४) श्‍यामला ही अनिताच्या घरी आली असता तिला घरात सार्थक एकटाच दिसला. यावेळी तिने कुणालाही न सांगता, सार्थकला घेऊन तेथून पळ काढला. याच रात्री बीड तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला होता. यामुळे अंकुशनगर भागातील कर्परा नदीला पूर आला होता. याचाच फायदा घेऊन श्‍यामलाने सार्थकला नदीत फेकून दिले व सार्थक बुडाला असल्याची खात्री झाल्यानंतर तेथून पळ काढला. परंतु दुसरीकडे सार्थक बेपत्ता असल्यामुळे अनिताने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. शिवाजीनगर पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी अनिताला बुधवारी जिल्हा रुग्णालयात बोलावले. याचदरम्यान अनिताने ‘माझ्या मुलाला श्‍यामलाने मारले असावे,’ अशी शंका व्यक्त केली. यावरून शिवाजीनगर पोलिसांनी तत्काळ श्‍यामलाला अटक केली. यावेळी श्‍यामलाने सार्थकला पाण्यात फेकून दिल्याची कबुली दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four year old son thrown into river in beed