
तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत. या गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, वैयक्तिक सिंचन विहीर, घरकुल, वृक्षसंगोपन, नर्सरी, तुती लागवड, बांधावरील वृक्ष लावगड आदी कामांचा समावेश असून जवळपास दीड हजार मजूरांच्या हाताला कामे मिळाली आहेत.
कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे कामासाठी स्थलांतर केलेल्या व संकटाच्या काळात गावी परतलेल्या एक हजार ३९६ मजूर व कामगारांच्या हातांना रोजगार मिळाला आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागामधून कामासाठी स्थलांतर केलेल्या मजूर व कामगारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगाराची सर्व कामे ठप्प झाली. कामाच्या शोधात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी शहरांत स्थलांतर झालेले ग्रामस्थांनी आपल्या मूळ गावी परतायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा - आवाजाचे गुढ उकलेना, हिंगोली जिल्ह्यात पुन्हा हादरे...
७० ग्रामपंचायतींतर्गत कामे
या मजूर, कामगार नागरिकांच्या हाताला काम मिळावे, याकरिता प्रशासनाने ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेची कामे सुरू करून मजुरांच्या हातांना काम देण्यासाठी पुढाकार घेतला होता. यामधूनच आता तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेंतर्गत कामे हाती घेण्यात आली आहेत.
पाणीपुरवठा विहिरींची कामे
या गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर, वैयक्तिक सिंचन विहीर, घरकुल, वृक्षसंगोपन, नर्सरी, तुती लागवड, बांधावरील वृक्ष लावगड आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये चाळीस गावांमधून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे हाती घेण्यात आली आहेत.
विविध गावांचा समावेश
यात असोला, असोलवाडी, बेलथर, भोसी, भुरक्याची वाडी, बिबगव्हाण, बोल्डावाडी, चिंचोर्डी, चुंचा, दाभडी, देवजना, डिगी, गोरलेगाव, कडपदेव, कळमकोंडा खुर्द, काळ्याची वाडी, कामठा, कांडली, कवडा, नरवाडी, नवखा, पाळोदी, पार्डी, पेठवडगाव, पुयना, रामेश्वरतांडा, रेडगाव, रुद्रवाडी, सालापूर, सांडस, सिंदगी, सुकळीवीर, तरोडा, तेलंगवाडी, वाई, वारंगा तर्फे नांदापूर, येळेगाव तुकाराम, येळेगाव गवळी, येलकी, धार धांवडा या गावांचा समावेश आहे.
मजुरांना रोजगार उपलब्ध
या ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. तर ६८ ठिकाणी वैयक्तिक सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. आखाडा बाळापूर, पुयना, नवखा, कडपदेव व पेठवडगाव या ठिकाणी वृक्ष संगोपनाची कामे हाती घेत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.
येथे क्लिक करा - हिंगोलीत १८ जवानांनी जिंकले ‘कोरोना युद्ध’
रोजगार हमी योजनेची २२९ कामे
अनेक गावातून लाभार्थींनी मंजूर झालेल्या घरकुलांची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे आज मितीस तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींतर्गत रोजगार हमी योजनेची २२९ कामे सुरू करण्यात आली आहेत. यामधून तेराशे ९६ मजुरांच्या हाताला रोजगार मिळाला आहे.
क्वारंटाइन सेंटरमध्ये अडकले कामगार
तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहे. कामाच्या शोधात स्थलांतर झालेले मजूर, कामगार आता गावाकडे परतत आहेत. क्वारंटाइन सेंटरमध्ये किमान १४ दिवस तरी थांबावे लागणार असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रशासन रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून दिल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी या कामांवर स्थलांतरीत मजूरच आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.