निलंगेकर अर्बन बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा, भावानीच केली भावाच्या विरोधात फिर्याद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 November 2020

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-आॕपरेटिव्ह सहकारी बँकेत महाराष्ट्र शिक्षण समितीच्या ठेवलेल्या ठेवी व चालू खात्यातील रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापकावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

निलंगा (जि.लातूर) : डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन को-आॕपरेटिव्ह सहकारी बँकेत महाराष्ट्र शिक्षण समितीच्या ठेवलेल्या ठेवी व चालू खात्यातील रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापकावर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका भावाने दुसऱ्या सख्ख्या भावाच्या विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याने पुन्हा एकदा 'निलंगेकर' घराणे चर्चेत आले आहे. याबाबत निलंगा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शिक्षण समितीचे उपाध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांनी येथील डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर अर्बन बँकेमध्ये महाराष्ट्र शिक्षण समितीच्या १३ ठेवी व चालू खात्यातील २९ लाख ७२०१ रुपये असे एकूण १ कोटी ३० लाख ५७, २०१ रुपये ठेवण्यात आली होती.

स्वतः च्या फायद्यासाठी बॅंकेचे अध्यक्ष डॉ. शरद पाटील निलंगेकर, बँकेचे संचालक मंडळ, शाखा अधिकारी व कर्मचारी यांनी अपहार केल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक लातूर यांच्याकडे दिल्याने याबाबत पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक पी.आर.यादव यांनी अर्जदारांचा जबाब नोंदवून सादर केल्याने पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने बॅंकेचे अध्यक्ष शरद पाटील निलंगेकर, संचालक मंडळ, शाखा अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक पी. आर. यादव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. विजयकुमार पाटील निलंगेकर व डॉ. शरद पाटील निलंगेकर हे दोघे सख्खे भाऊ असल्यामुळे एका भावाने दुसऱ्या भावाच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला असून पुन्हा एकदा निलंगेकर घराणे यानिमित्ताने चर्चेत आले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud Charge Filed Against Nilangekar Urban Bank Chairman, Board Of Directors