बीड जिल्हा - तीन लाख ६३ हजारांवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

पहिली ते आठवीच्या तीन लाख ६३ हजार ५२६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या तीन लाख २६ हजार ५२८, तर उर्दू माध्यमाच्या ३६ हजार ९४२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.

बीड - समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते आठवीच्या तीन लाख ६३ हजार ५२६ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या तीन लाख २६ हजार ५२८, तर उर्दू माध्यमाच्या ३६ हजार ९४२ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व वितरण महामंडळाच्या (बालभारती) औरंगाबाद विभागीय डेपोतून जिल्ह्यात तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांचा पुरवठा सुरू असल्याची माहिती प्राथमिकचे प्रभारी शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी दिली. 

कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रास विलंबाने सुरवात होण्याची शक्यता आहे; परंतु शैक्षणिक सत्र जुलै महिन्यात सुरू होऊ शकते. असे असले तरी शिक्षण विभागाने शैक्षणिक सत्राची तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद शाळा, शासकीय शाळा आणि खासगी व्यवस्थापनाच्या युडायसमध्ये नोंद असलेल्या अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके देण्यात येतील. युडायसनुसार विद्यार्थी संख्या व उपलब्ध करून देण्यात आलेली पाठ्यपुस्तकावरून पाठ्यपुस्तकांचे काही संच शिल्लक असल्याने शिल्लक पुस्तकांची संख्या वगळता पाठ्यपुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

हेही वाचा - माजलगाव नगरपालिकेतील १८२ सफाई कर्मचाऱ्यांवर संक्रांत

पुस्तक वितरणाचे काम योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना जबाबदारी दिली आहे; तसेच शिक्षण विस्तार अधिकारी, गटसमन्वयक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व विशेष शिक्षक आदींचे गट तयार करून वाटपाचे नियोजन केल्याचेही अजय बहिर यांनी सांगितले. १३ जूनपर्यंत तालुकास्तरावर तर पुढील तीन दिवसांत शाळास्तरावर पुस्तक वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन्स ठेवून पाठ्यपुस्तके पुरविण्याचे नियोजन सुरू आहे. परळी तालुक्यातील शाळांसाठी यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने एकात्मिक पुस्तके देण्यात येणार आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free textbooks for over 3 lakh 63 thousand students