उमरगा : महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेचा १३८ जणांना मिळाला लाभ

अविनाश काळे
Friday, 11 December 2020

प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत महिलांच्या कठीण शस्त्रक्रिया व नुकत्याच जन्मलेल्या बाळांच्या आजारावर मोफत उपचार करण्यासाठी शहरातील साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सर्वसामान्य कुटुंबासाठी आधार ठरत आहे.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत महिलांच्या कठीण शस्त्रक्रिया व नुकत्याच जन्मलेल्या बाळांच्या आजारावर मोफत उपचार करण्यासाठी शहरातील साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सर्वसामान्य कुटुंबासाठी आधार ठरत आहे. दरम्यान या योजनेतून पाच महिन्यांत १३८ जणांना लाभ मिळाला आहे. आरोग्य सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोचलेली असली तरी त्या परिपूर्ण सुविधा मिळण्याच्या अडचणी असल्याने अनेक सामान्य कुटुंबातील व्यक्तींना महागड्या आरोग्य सुविधेचा पर्याय स्वीकारावा लागतो. मूळात ही समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा ज्योतीबा फुले आरोग्य योजना सुरू करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

या योजनेला प्रतिसादही मिळत आहे. उमरग्यात नव्याने सुरू झालेल्या साई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या योजनेचे केंद्र सुरू झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात ही योजना या रुग्णालयात सुरू झाल्याने महिलांच्या विविध आजारावरील शस्त्रक्रिया, सिझेरिंग, नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या कठीण आजारावरील उपचार येथे केले जाताहेत. प्रसूतीच्या सिझेरिंग २३, कठीण स्थितीतील प्रसूती आठ, दुबिर्णीद्वारे गर्भाशयाच्या आठ शस्त्रक्रिया आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला जडलेल्या डेंग्यू, कावीळ सारखा आजार, कमी वजनाचे बाळ अशा १०३ बाळांवर यशस्वी मोफत उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान हॉस्पिटलचे डॉ.सचिन तावशीकर, डॉ. अजित शिंदे, डॉ. अनंत मुगळे, डॉ. सिद्राम ख्याडे, डॉ. मैत्री तावशीकर यांची टीम या योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांवर योग्य उपचार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरोग्य मित्र बालाजी घोडके, सहायक पंढरीनाथ भोसले, अविनाश राठोड योजनेची माहिती लाभार्थ्यांच्या कुटुंबाना देत आहेत.

 

 

महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना सर्वांसाठी आहे. विविध आजारावरील शस्त्रक्रिया व उपचारासाठी योजनेतील निकषाप्रमाणे केले जात आहेत. विशेषतः महिलांच्या प्रसूतीदरम्यानची कठीण परिस्थिती पाहुन नॉर्मल प्रसूतीचा प्रयत्न या योजनेतून केला जातोय. सिझर, बाळांचे विविध आजारावर उपचारही योजनेतून केले जातात. या योजनेसंदर्भात आरोग्य मित्रांकडून अधिक माहिती घेऊन योजनेचा लाभ घ्यावा.
-  डॉ.अनंत मूगळे, साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Free Treatment On Women Critical Operations, Sizer In Mahatma Jotiba Phule Health