शेतकरी मित्राच्या खात्यातून काढले पावणेदोन लाख 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

अजिंठा - बॅंकेकडून टपालाद्वारे आलेले शेतकऱ्याचे एटीएम कार्ड, चेकबुक मित्राने परस्पर सोडवून घेतले. शेतकऱ्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत सलग चार वर्षे एटीएम परस्पर वापरून खात्यातून एक लाख ऐंशी हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी कौतिक देवराव पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी भिका शेळके याच्याविरुध्द शुक्रवारी (ता. तेरा) अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वडाळा (ता. सिल्लोड) येथील कौतिक देवराव पांडे यांना २०१४ मध्ये आयसीआयसीआय बॅंकेने टपालाद्वारे एटीएम कार्ड, चेकबुक पाठविले होते. त्यांचा गावातील मित्र शिवाजी शेळके याने ते सोडवून घेतले व १९ सप्टेंबर २०१४ ते २१ फेब्रुवारी २०१८ दरम्यान एटीएम कार्ड, चेकबुकद्वारे एक लाख ८० हजार रुपये खात्यातून काढले. कौतिक पांडे यांनी सिल्लोडच्या आयसीआयसीआय बॅंकेतून दोन वर्षांपूर्वी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. शेतीत उत्पन्न न झाल्याने त्यांनी शेती विकून बॅंकेचे कर्ज भरले. बॅंकेने त्यांना पुन्हा कर्ज दिले. कर्जमंजुरीसाठी शिवाजी शेळके त्यांच्यासोबत बॅंकेत यायचा. त्याला बॅंकेत जमा झालेल्या रकमेची माहिती मिळत होती. त्याने वारंवार शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे काढून घेतले. 

अशिक्षित, एटीएम वापरता येत नसलेल्या शेतकऱ्याच्या खात्यातून पैसे काढले जात असल्याने बॅंक कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन विचारणा केली. मी पैसे काढलेच नाहीत, असे शेतकऱ्याने सांगितले. बॅंक अधिकारी, शेतकरी यांनी अजिंठा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व शेतकऱ्यास दाखविले. पांडे यांच्या तक्रारीनुसार सायबर सेल विभागाचे फौजदार सय्यद मोहसीन अली यांनी अजिंठा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शिवाजी भिका शेळके याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला. आरोपीस जेरबंद करून सिल्लोड न्यायालयासमोर हजर केले असता त्यास १६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Friend cheating in Ajintha