इंधनाचा टॅंकर भासवून मळीची वाहतूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

नांदेड - इंडियन ऑईल टॅंकरच्या नावाखाली दारू बनविण्यासाठी अवैधरीत्या मळी घेऊन जाणारा टॅंकर पकडून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. एक लाखाच्या मळीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नांदेड व औरंगाबादच्या संयुक्त पथकाने परभणी-गंगाखेड रस्त्यावर इसाद शिवारात शनिवारी (ता. २६) सकाळी ही कारवाई केली.

परभणी जिल्ह्यातील त्रिधारा शुगर लिमिटेड (आमडापूर) येथून ‘इंडियन ऑईल’ असे लिहिलेल्या टॅंकरमधून गावठी दारूसाठी अवैधरीत्या २२ टन मळीची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे नांदेडमधील अधीक्षक नीलेश सांगडे यांना शुक्रवारी (ता. २५) मिळाली. त्यांनी विभागाचे आयुक्त डॉ. अश्‍विनी जोशी, संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना या संदर्भात माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार सांगडे यांनी पथक स्थापन केले. मदतीला औरंगाबादचे पथक घेतले. कारखान्यावरून हा टॅंकर सोलापूरला निघाल्याचे कळताच पथकांनी ठिकठिकाणी लक्ष ठेवले. अखेर इसाद शिवारात टॅंकर पकडला.
टॅंकरचालक दत्तात्रय लक्ष्मण मुळे, क्‍लिनर लक्ष्मण विलास खटके यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. चौकशीअंती त्यांनी खरी माहिती दिली. 

दरम्यान, मळी देणाऱ्या कारखान्याचीही चौकशी करणार असल्याचे सांगडे यांनी सांगितले. निरीक्षक एस. एस. खंडेराय, पी. ए. मुळे, डी. एन. चिलवंतकर, आनंद कांबळे, एस. एम. बोदमवाड, रफत कोतवाल आदींनी या कारवाईत भाग घेतला. आनंद कांबळे तपास करीत आहेत.

कराराबाबतही बनवाबनवी
टॅंकरवर इंडियन ऑईल कंपनीचे बोधचिन्ह असून, त्यामध्ये पेट्रोल-डिझेल असल्याचे भासवून अवैधरीत्या मळीची वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. इंडियन ऑईल कंपनीशी करार झाल्याबाबतचे टॅंकरवर नमूद आहे; परंतु पथकाने अधिक माहिती घेतली असता कंपनीने करार केला नसल्याचे आढळले.

Web Title: fuel tanker mali transport liquor