ध्वजदिनासाठी बुधवारपासून निधी संकलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 डिसेंबर 2016

औरंगाबाद - माजी सैनिकांच्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी देशात सात डिसेंबर हा "ध्वजदिन' म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त सात डिसेंबर ते पुढील वर्षाच्या नोव्हेंबरअखेरपर्यंत निधी गोळा केला जाणार आहे. या निधीतून माजी सैनिकांचे पुनर्वसन, कुटुंबीयांच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात.

ग्रामीण भागातील माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी शहरांत जावे लागते. या पाल्यांसाठी राज्यात याच निधीतून 52 वसतिगृहे बांधण्यात आली आहेत. त्यापैकी 35 मुलांची, तर 17 मुलींची वसतिगृहे आहेत. वसतिगृहाच्या देखरेखीचा खर्चदेखील याच निधीतून केला जातो. राज्याला यंदा 2016-17 या वर्षासाठी तीस कोटी बारा लाख रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही रक्कम 7 डिसेंबर 2017 ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत जमा करावयाची आहे.

निधी संकलनात लहानमोठ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने निधी देणाऱ्यास पावती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. निधी गोळा करण्याची डबा पद्धत बंद करण्यात आली असून, केवळ ध्वजदिन निधी संकलनाच्या आरंभाच्या कार्यक्रमात सीलबंद डबे आणता येणार आहेत. जिल्हा समितीने महिन्यातून एकवेळा बैठक घेऊन बैठकीत महिन्यात संकलित झालेल्या निधीचा आढावा घेऊन माहिती संचालक सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्याकडे कळवावी लागणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
या निधी संकलनासाठी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा उद्योग, शिक्षणाधिकारी, प्रसिद्धी अधिकारी, सैनिक कल्याण अधिकारी आदींचा सदस्य म्हणून समावेश आहे.

Web Title: fund collection for republic day