ग्रामपंचायतीसमोर खड्डा खणून अंत्यसंस्कार 

ज्ञानेश्‍वर पुंगळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

स्मशानभूमीला जागा नसल्याने भोकरदन तालुक्यातील राजूर येथे चक्क ग्रामपंचायतीसमोर खड्डा खणून अंत्यविधी करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. एक) दुपारी तीन वाजता घडली.

राजूर (जि. जालना)-  स्मशानभूमीला जागा नसल्याने भोकरदन तालुक्यातील राजूर येथे चक्क ग्रामपंचायतीसमोर खड्डा खणून अंत्यविधी करण्यात आला. ही घटना शनिवारी (ता. एक) दुपारी तीन वाजता घडली. दरम्यान, तहसीलदार, पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. 

जालना जिल्ह्यातील राजूर येथील लिंगायत वाणी समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्‍न प्रलंबित आहे. त्यातच येथील मनकर्णाबाई शिवमूर्तीअप्पा जितकर (वय ७५) यांचे शनिवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर कुठे अंत्यसंस्कार करायचे याबाबत नातेवाइकांनी ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली; परंतु कार्यालयाकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईक व शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजूर ग्रामपंचायत कार्यालयावरच दुपारी अंत्ययात्रा काढली. समाजाचा मोठा जमाव एकत्र आला. त्यामुळे वातावरण तापले. सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामसेवक एस. बी. शिंदे यांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; मात्र उपयोग झाला नाही.

हेही वाचा : जालन्यात मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

त्यानंतर ग्रामपंचायतीसमोरच जमावाने दफनविधीसाठी जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदला. विधिवत पूजा करून मनकर्णाबाई यांचा दफनविधी करण्यात आला. सरपंच भाऊसाहेब भुजंग, ग्रामसेवक शिंदे यांनी पोलिस प्रशासन, महसूल प्रशासनाला तत्काळ याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी उदयसिंह राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक संतोष घोडके, कैलास पुंगळे, तलाठी अण्णा कड आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात धाव घेतली. तोपर्यंत दफनविधी झाला होता. दफनविधी केलेला मृतदेह बाहेर काढण्याबाबत विनंती करण्यात आली; मात्र शिवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष कैलास गबाळे, सतीश तवले, तसेच मृताचे नातेवाईक यांनी ‘जोपर्यंत आम्हाला राजूर येथील गायरानामध्ये स्मशानभूमीची जागा दिली जात नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. तुम्ही मृतदेह काढा व आमच्यावर गुन्हा दाखल करा,’ असा पवित्रा घेतला. वर्ष २०११ पासून स्मशानभूमीसाठी ग्रामपंचायत व शासनाकडे जागा मागत असून, आमची दखल न घेतल्यामुळे आम्ही हे टोकाचे पाऊल उचलल्याचे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास गबाळे यांनी सांगितले.

हेही वाचा : प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा

दरम्यान, रात्री सात वाजता आरती करून नातेवाईकही घरी परतले. तर ग्रामपंचायतीचे कर्मचारी, पोलिस, महसूलचे अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral in front of Gram Panchayat in Rajur