प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा उभारणार

जालना : कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी.
जालना : कोरोना चाचणी प्रयोगशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदी.

जालना -  जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या ‘कोविड-१९’ आरटीपीटीसीआर या कोरोना चाचणी प्रयोगशाळेचे ई पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रविवारी (ता.१२) उद्‌घाटन करण्यात आले. दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यात कोरोना चाचणीची प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती श्री.ठाकरे यांनी दिली.

यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलिस अधीक्षक चैतन्य एस.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड आदींची उपस्थिती होती. 

उद्‌घाटनानंतर ऑनलाइन संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ही बाबी चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरीत्या लढा द्यावा लागेल. मार्च महिन्यात राज्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या ११० वर पोचली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत. जालना शहरात आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून कोरोना विषाणूची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून, आपला देश व राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करीत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून, रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबींवर भर देण्यात येत आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून, येणाऱ्या काळात या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेसह आपणा सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी ठेवण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत या लढ्यात आरोग्य, पोलिस, महसूल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लढत असून, या सर्वांचे कार्य कौस्तुकास्पद व अभिनंदनीय असल्याचेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. 

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले, की केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोनासंबंधी योग्य ती उपाययोजना करीत असून, नागरिकांनी आता स्वत:हून पुढे येऊन कोरोनासंबंधीची काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून नागरिकांना प्रयोगशाळेपर्यंत येण्याची गरज पडणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
यावेळी   प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. जगताप, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, डॉ. हयातनगरकर, डॉ. संजय राख, डॉ. रायठठ्ठा, डॉ. मोजेस, डॉ. चव्हाण, उपअभियंता चंद्रशेखर नागरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

अँटीबॉडी टेस्टिंग मशीन लवकरच : टोपे 

आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, की बी.एस.एल.- ३ या आधुनिक पद्धतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करून रुग्णांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत. आधुनिक व सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत बुरशी, विषाणू, जिवंत राहू शकणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. कोविडबरोबरच या प्रयोगशाळेत आनुवंशिकतेसंबंधी, एचआयव्ही, साथीचे आजार यासह अन्य तपासण्या केल्या जातील. येथे प्लाझ्मा थेरेपी व अँटीबॉडी टेस्टिंग मशीन लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले. जालन्यातील प्रयोगशाळेच्या माध्यमातून दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्या निकट सहवासितांची ओळख होईल व त्यांच्या देखील तपासण्या करून कोरोनाबाधितांवर तातडीने उपचार करणे सोयीचे होणार आहे, असे त्यांनी नमूद केले. 

(संपादन : संजय कुलकर्णी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com