जालन्यात आता मोबाइल व्हॅनव्दारे स्वॅब टेस्टिंग

उमेश वाघमारे 
Friday, 10 July 2020

जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातून कोरोनाबाधिताच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींची स्वॅब टेस्टिंगसाठी सहा मोबाइल व्हॅन उपलब्ध झाल्या आहेत. जालना शहरातील ३६ वॉर्डामध्ये टेस्टिंगसाठी वेळापत्रक ठरविले आहे.

 जालना - शहरातील कोरोना बाधिताच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींची आता मोबाईल व्हॅनद्वारे स्वॅब टेस्टिंग केली जाणार आहे, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी शुक्रवारी (ता.दहा) दिली.  

शहरातील टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे शुक्रवारी (ता.दहा) नगरसेवकांची मोबाइल व्हॅनच्या वेळापत्रकाची माहिती देण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा : दिवस येतील छान, घेऊ नका ताण

बैठकीत यासंदर्भात माहिती देताना मुख्याधिकारी श्री. नार्वेकर म्हणाले, की जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातून कोरोनाबाधिताच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींची स्वॅब टेस्टिंगसाठी सहा मोबाइल व्हॅन उपलब्ध झाल्या आहेत.

हेही वाचा : पावसाचं पाणी, आबादानी...

जालना शहरातील ३६ वॉर्डामध्ये टेस्टिंगसाठी वेळापत्रक ठरविले आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयाचा वैद्यकीय पथक हे या मोबाइल व्हॅनसोबत असणार असून ते स्वॅब घेणार आहेत. दरम्यान या कामासाठी संबंधित वॉर्ड नगरसेवक ही सहकार्य करणार आहेत, असे मुख्याधिकारी श्री. नार्वेकर यांनी सांगितले. 

टेस्टिंगची वाढणार गती

जालना शहरातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढलेला आहे. त्यातच शहरातील कोरोना बाधिताच्या हायरिस्क संपर्कातील व्यक्तींच्या संख्येतही भर पडत आहे. त्यामुळे टेस्टिंगची गती वाढविण्याची गरज होती, आता सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातूनसहा मोबाइल व्हॅन उपलब्ध झाल्याने टेस्टिंगची गती वाढणार आहे.

(संपादन : संजय कुलकर्णी)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile van for corona testing in Jalna