मोबाईलच्या उजेडात करावे लागतात अंत्यसंस्कार!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

औरंगाबाद - कचरा, पाणी, बंद पथदिव्यांमुळे शहरातील नागरिकांना जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यात आता एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरात सुमारे चाळीसहून अधिक स्मशानभूमी व तेवढेच कब्रस्तान आहेत.

या ठिकाणी असलेला अंधार, रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे अंत्यविधीसाठी गेलेल्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत असून, अनेक ठिकाणी रात्री मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत असल्याने महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.  

महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत अंत्यसंस्कार योजना सुरू केली होती. शिवसेनेची सत्ता असतानादेखील दीड-दोन वर्षांतच या योजनेचा बोजवारा उडाला. यंदा पुन्हा महापौरांनी या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. मात्र ही योजना निविदा प्रक्रियेत अडकली आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्मशानभूमींना अवकळा आली आहे. विशेषतः शहर परिसरात असलेल्या मुकुंदवाडी, नारेगाव, चिकलठाणा, सातारा देवळाई, पडेगाव भागातील स्मशानभूमीतील ५० टक्के पथदिवे बंद आहेत. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची वाट लागलेली आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले कुटुंबीय व नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दोन आठवड्यांपूर्वी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी स्मशानभूमीमध्ये प्राधान्याने एलईडी दिवे बसवावेत, असे पत्र आयुक्तांना दिले आहे. मात्र अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी रात्री मोबाईल बॅटरीच्या उजेडात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. 

आंदोलनाचा इशारा 
दशनाम गोसावी समाजासाठी नारेगाव येथे स्मशानभूमी आहे. या ठिकाणी विविध कामे करण्यासाठी गेल्या वर्षी १९ लाख ९९ हजार ११५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या निष्क्रियतेविरोधात मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा योगेश बन, किरण गिरी, बंडू पुरी, कृष्णा गिरी, विठ्ठल पुरी, धीरेंद्र पुरी यांनी दिला.

दोन किलोमीटरची पायपीट
शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मात्र नव्या भागात स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारासाठी दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरून मृतदेह घेऊन यावे लागत आहे.

Web Title: Funeral in Mobile Light