लागेबांध्यांचा जुगार "धंदा'!

मनोज साखरे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

असे आहेत लागेबांधे
अवैध क्‍लब अनेक शहरांत छुप्या पद्धतीने चालतात. कारवाईवेळी जुगार व्यावसायिकांशी पोलिसांचा संबंध येतो. जुगार खेळणाऱ्यांवर आधी ठोस कारवाई होते. पोलिसांकडून अडचण वाढल्यास जुगार व्यावसायिक ऑफर देऊ करतात. याचा स्वीकार यंत्रणेतील काही जण करतात. तेथून लागेबांध्यांचा खेळ सुरू होता.

औरंगाबाद - पत्ते असो की मटका अथवा ऑनलाइन जुगारांमुळे अनेक जण रात्रीत उद्‌ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत. अशांवर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेतील काही जण जुगारबाजांसाठी बऱ्याचदा मेहेरबान असल्याने हा धंदा छुप्या पद्धतीने तेजीत आहे. कोट्यवधींची उलाढाल दरदिवशी असून, राज्यात बंदी असतानाही सर्रास जुगार खेळला जातो. थातूरमातूर कारवाया होतात; पण जुगार थांबविण्यात यंत्रणेला मात्र यश आलेले नाही.

विरंगुळा म्हणून काही बड्या हॉटेल्स आणि क्‍लबमध्ये विशिष्ट खेळाच्या प्रकारांना अटी व शर्थीनुसार परवानगी दिली जाते; परंतु त्यात पैशांचा व्यवहार आल्यास तो जुगार ठरतो. अशावेळी पैशांचा व्यवहार होत असेल तर कडक कारवाई करून परवानगी रद्द करण्याचेही नियम आहेत. पोलिस यंत्रणेकडे नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे.

त्यांच्याकडून बऱ्याचदा कारवायाही होतात; परंतु सातत्याचा अभाव, काही पोलिसांना जुगारबाजांकडून "अर्थ'पूर्ण तडजोड मिळत असल्याने जुगार वाढताच आहे. त्याला नव्याने उदयास आलेल्या ऑनलाइन जुगाराची मोठी साथ मिळत आहे.

जुगार का चालतो..
-इंटरनेटच्या प्रगतीनंतर जुगार ऑनलाइन झाला.
-ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यात अडचणी.
-व्यक्तिगत पातळीवर जास्त जुगार खेळला जात असल्याने प्रत्यक्ष कारवाईला अडचण.
-पोलिस यंत्रणेतील काही जणांचे लागेबांधे, त्यामुळे कारवाया टाळल्या जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambling Crime Matka

टॅग्स