गणेश मंडळांना ऑनलाइन परवाने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळांना ऑनलाइन परवाने मिळणार आहेत. त्यासाठी मंडळांना शुक्रवारपासून (ता. 23 ) आपली नोंदणी करता येणार आहे. पोलिसांच्या संकेतस्थळावर हे विविध परवाने ऑनलाइन पद्धतीने मिळू शकणार आहेत.

उस्मानाबाद ः गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही गणेश मंडळांना ऑनलाइन परवाने मिळणार आहेत. त्यासाठी मंडळांना शुक्रवारपासून (ता. 23 ) आपली नोंदणी करता येणार आहे. पोलिसांच्या संकेतस्थळावर हे विविध परवाने ऑनलाइन पद्धतीने मिळू शकणार आहेत. गणेश मंडळांना अर्ज केल्यानंतर जलदगतीने परवाने देण्यासाठी पोलिस विभागाचे प्रयत्न राहणार आहेत. 

ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेमुळे शहरातील सर्व वाहतूक विभाग, शहरातील दोन्ही पोलिस ठाण्यांना नियोजन करणे सोपे होणार आहे. दरम्यान, ऑनलाइन परवाने देण्यासंदर्भात पोलिस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी शुक्रवारी कार्यशाळाही होणार आहे.

...अशी द्यावे लागेल माहिती 
परवान्यासाठी "अर्ज भरा' अशी लिंक देण्यात आली आहे. त्यावर क्‍लिक केल्यानंतर गणेश मंडळांची सर्व माहिती अर्ज भरणाऱ्या व्यक्तीला ऑनलाइन भरावी लागणार आहे. त्यामध्ये गणेश मंडळाचे नाव, पत्ता, मंडपाचे ठिकाण, मंडपाचा आकार, पदाधिकाऱ्यांची माहिती, मिरवणूक मार्ग, देखाव्यांची माहिती, जवळचे क्षेत्रीय कार्यालय, वाहतूक शाखा अशा पद्धतीची सर्व माहिती ऑनलाइन अर्जामध्ये भरावी लागणार आहे. मंडळ किंवा त्याच्या पदाधिकाऱ्यांवर यापूर्वी गुन्हे दाखल झाले असल्यास त्याचीही माहिती अर्ज भरताना देणे गरजेचे असणार आहे. 

चकरा मारण्याची गरज नाही
एकदा ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारे परवान्यांसाठी पोलिस किंवा प्रशासनाच्या कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेट द्यावी लागणार नाही. अर्जामध्ये प्रशासनाला किंवा पोलिसांना काही अडचणी आल्यास ते स्वतः संबंधित मंडळांना संपर्क साधणार आहेत. एकदा अर्ज सादर केल्यानंतर प्रत्येत टप्प्यावरील कार्यवाहीबाबची माहिती प्राप्त होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज देण्याचा हा उपक्रम दोन्ही घटकांसाठी अत्यंत उपयुक्त असून वेळ व श्रमाची बचत होणार आहे. 

ऑनलाइन परवाने काढणाऱ्या मंडळाची संख्या दोनशेच्या पुढे होती, तर जिल्ह्यात हा आकडा पाचशेच्या पुढे होता. यंदा त्याच प्रमाणात किंवा काहीशी जास्त संख्या राहील असे चित्र आहे. त्यातही गेल्या वर्षी ऑनलाइन प्रक्रिया न कळल्याने अनेकांनी परवाना घेण्याचे टाळले होते, पण यंदा मात्र अजूनही कालावधी असल्याने अधिकाधिक मंडळे परवाने घेण्यास पुढाकार घेण्याची शक्‍यता आहे. 
Ganesh boards licenses online


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh boards licenses online