बाप्पाला मनोभावे निरोप

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी गणेशभक्‍तांनी अशा रांगा लावल्या होत्या.
औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी गणेशभक्‍तांनी अशा रांगा लावल्या होत्या.

औरंगाबाद - दहा दिवस मनोभावे पूजा करीत, विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवीत, एकाहून एक असे सरस सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत रविवारी (ता. २३) ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्‍या गणरायाला शहरवासीयांनी निरोप दिला.

संस्थान गणपती येथून बैलगाडीमध्ये गणेशमूर्ती ठेवून मुख्य मिरवणुकीला सुरवात झाली. पारंपरिक पद्धतीने गणेश मंडळांनी सजावट करीत आपापल्या कला सादर केल्या. एकापाठोपाठ एक शहागंज, धावणी मोहल्ला, जाधवमंडीसह इतर मंडळे सहभागी झाली होती. सिटी चौकात भडकल गेट आणि शहागंजमार्गे गणेश मंडळे दाखल झाली होती. त्यावेळी ढोल-ताशांसह झांज पथकांच्या सादरीकरणासोबतच रांगेमध्ये सहभागी होण्यावरून पोलिस अधिकारी आणि मंडळांचे पदाधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली; मात्र काही ज्येष्ठांच्या मध्यस्थीमुळे यातून मार्ग काढण्यात आला. 

जिल्हा गणेश महासंघातर्फे सिटी चौक येथे गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गामध्ये शिवसेना, भाजप, मनसे, ब्राह्मण युवक मंडळ, अश्‍वमेध क्रीडा मंडळासह अन्य संघटनांनी गणेशभक्‍तांचे स्वागत केले.

बेगमपुरा येथील क्रीडा मंडळांनी ढोल-ताशांचे सादरीकरण केले. तसेच रणसंग्राम क्रीडा मंडळ, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा यांनी ओला-सुका कचरा, वृक्षलागवड, संवर्धन याबाबत जागृती केली. त्यानंतर ओम मृत्युंजय क्रीडा मंडळ, शहागंज येथील नवसार्वजनिक गणेश मंडळाने सापुतारा (गुजरात) येथील आदिवासी नृत्य सादर करणारे पथक पाचारण केले होते. या पथकाच्या नृत्याने चांगलीच रंगत आणली. श्री संगम नवयुवक क्रीडा मंडळाने विविधतेमध्ये एकता असल्याचे दाखविले. श्री बाल कन्हैया गणेश मंडळ, धावणी मोहल्ला, अष्टविनायक गणेश मंडळ, जाधवमंडी बांबू मार्केट, पावन गणेश मंडळ, नारळीबाग, महाकाल ढोल पथक, पदमपुऱ्यातील हरहर महादेव क्रीडा मंडळ, पदमपुरा मित्रमंडळ, बेगमपुरा येथील संभाजी क्रीडा मंडळ, सावता गणेश मंडळाने आपापले देखावे सादर केले. शहागंज, गांधी पुतळा, सराफा, सिटी चौक, मछली खडक, गुलमंडीमार्गे औरंगपुरा येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावरील विहिरीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. रात्री बाराच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील मुख्य विसर्जन विहिरीवर जिल्हा गणेश महासंघाच्या श्रीगणेशाची आरती करण्यात आली. त्यानंतर विसर्जन झाले. यावेळी अभिजित शिंदे निर्मित व सरला शिंदे प्रस्तुत श्री गणेश भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com