महापालिका वठणीवर, आजपासूनच औरंगाबादेत कचरा संकलन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 फेब्रुवारी 2019

शनिवारपासूनच (ता. दोन) "डोअर टू डोअर' कचरा संकलनाची हमी महापालिकेने खंडपीठात दिली.

औरंगाबाद - शहरातील घनकचरा संकलनासाठी आतापर्यंत टाळाटाळ करणारी महापालिका खंडपीठाच्या भूमिकेनंतर तातडीने वठणीवर आली. शनिवारपासूनच (ता. दोन) "डोअर टू डोअर' कचरा संकलनाची हमी महापालिकेने खंडपीठात दिली. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासमोर सुनावणी झाली. दरम्यान, महापालिकेच्या विरोधातील याचिकांवर मंगळवारपासून नियमित सुनावणी होणार आहे.

 महापालिका नागरिकांना मूलभूत बारा नागरी सुविधाही देण्यात अपयशी ठरली असल्याने, महापालिका बरखास्त करून प्रशासक नियुक्त करावा, अशी विनंती करणाऱ्या याचिकेसह घन कचरा, प्रदूषित पाणी आदींसंदर्भाने दाखल याचिकांवर शुक्रवारी (ता. एक) खंडपीठात सुनावणी झाली. खंडपीठाने गुरुवारी (ता. 31) झालेल्या सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार आरटीओ कार्यालयाने शपथपत्र सादर करून महापालिकेची आतापर्यंत 123 वाहने नोंदणी केली. उर्वरित वाहनांचे शुल्क भरण्यास रविवारी सुटीच्या दिवशीही सर्व वाहने नोंदणी करून देण्याची तयारी आरटीओ कार्यालयाने दर्शवली. त्यावर नोंदणी केलेल्या वाहनांचे काय झाले, असा सवाल खंडपीठाने विचारताच आरटीओने नोंदणी केलेल्या 123 आणि पूर्वीच्या 100 वाहनांच्या माध्यमातून शनिवारपासून कचरा संकलन करण्यात येईल, असे स्पष्ट केले. रविवारी आरटीओने उर्वरित वाहनांची नोंदणी केल्यानंतर सोमवारी सर्वच वाहनांच्या माध्यमाने पूर्ण क्षमतेने कचरा संकलन करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली. 
 

खतनिर्मितीच्या खड्ड्यांचा अहवाल द्या 
घन कचऱ्यातून खतनिर्मिती होणाऱ्या खड्ड्यांचाही प्रश्न खंडपीठात उपस्थित करण्यात आला. या खड्ड्यांतून घन कचरा साठवून खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे मनपातर्फे सांगण्यात आले. त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. 
 

दररोज होणार सुनावणी 
नागरी समस्यांसंदर्भाने दाखल याचिकांवर मंगळवारपासून दररोज सुनावणी होणार आहे. कचऱ्यावरील मूळ याचिका राहुल कुलकर्णी यांची आहे. त्यांच्यासह अन्य इतर याचिकाकर्त्यांकडून ऍड. देवदत्त पालोदकर काम पाहत आहेत. पडेगाव व हर्सूल प्रश्नावरील याचिकाकर्त्यांकडून ऍड. प्रज्ञा तळेकर, मनपातर्फे ऍड. जयंत शहा, ऍड. राजेंद्र देशमुख, ऍड. संभाजी टोपे, उत्तरानगरीच्या प्रश्नांवर ऍड. ए. बी. काळे तर शासनाकडून अमरजितसिंह गिरासे व ऍड. सिद्धार्थ यावलकर यांनी काम पाहिले. 

Web Title: Garbage collection in Aurangabad today