फेकू नका, होणार असेल तेच सांगा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद - कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कोणती कामे केव्हा होणार आहेत, याची तंतोतंत माहिती द्या, फेकू नका, होणार असतील तीच कामे सांगा, अशा शब्दांत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी (ता. तीन) महापालिका अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ओला व सुका कचरा वेगवेगळा न करणारे नागरिक व कचऱ्याची स्वतः विल्हेवाट न लावणारे हॉटेल, मंगल कार्यालय चालक यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात गुरुवारी शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबतची आढावा बैठक प्रधान सचिव श्री. करीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी डीपीआरमध्ये कोणती कामे आहेत, ती केव्हापासून सुरू होणार आहेत? संपूर्ण प्रश्‍न सोडविण्यासाठी किती दिवस लागतील? असे प्रश्‍न केले. त्यावर महापालिका अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे फेकू नका, होणार असेल तेच सांगा, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच ‘‘महापालिकेमार्फत ओला कचरा हा दरदिवशी; तर सुका कचरा आठवड्यातील ठराविक दिवशीच गोळा करावा. १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्था, व्यापारी, खासगी, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसायिक यांच्यामार्फत त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसेल; तर दंडात्मक कारवाई करा,’’ असे आदेश त्यांनी दिले. 

विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी विविध उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीपूर्वी करीर यांनी महापालिकेचे प्रभारी आयुक्त उदय चौधरी यांच्यासोबत विविध ठिकाणी पाहणी केली. बैठकीला अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपसंचालक नगरपालिका प्रशासन रिता मेत्रेवार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

केवळ ६० हॉटेलकडे व्यवस्था 
शहरात तीनशेपेक्षा जास्त हॉटेल, मंगल कार्यालये असून, त्यांनी कचऱ्याची स्वतः विल्हेवाट लावणे आवश्‍यक आहे; मात्र केवळ ६० जणांकडे कचऱ्यापासून खत निर्मितीची व्यवस्था असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

Web Title: garbage issue nitin karir