औरंगाबाद शहरात कचरा पुन्हा पेटणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, कंपनीतर्फे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, मंगळवारी (ता. २८) प्रभाग दोनमध्ये कामगारांनी सकाळपासून ‘काम बंद’ आंदोलन केले. 

औरंगाबाद - महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, कंपनीतर्फे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, मंगळवारी (ता. २८) प्रभाग दोनमध्ये कामगारांनी सकाळपासून ‘काम बंद’ आंदोलन केले. 

सोमवारी (ता. २७) प्रभाग तीनमध्ये आंदोलन करण्यात आले होते. कचराकोंडीनंतर महापालिकेने चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे व शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन व वाहतूक करण्याचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने काम सुरू केले आहे. फेब्रुवारीपासून टप्प्या-टप्प्याने काम सुरू करण्यात आले असले, तरी चारच महिन्यात कंपनीविरोधात आंदोलनाचे सत्र सुरू झाले आहे. 

गेल्या महिन्यात कामगारांनी कंपनीकडून तुच्छ वागणूक मिळत असल्याचा आरोप करीत आंदोलन केले होते. त्यानंतर वेतन वेळेवर मिळत नसल्याने आंदोलन झाले. दरम्यान, सोमवारी प्रभाग तीनमध्ये कामगारांनी काम करण्यास नकार दिला. कंपनीतर्फे या कामगारांची समजूत काढण्यात आली. असे असतानाच मंगळवारी सकाळपासून प्रभाग दोनमध्ये भाजप प्रणीत बहुजन कामगार शक्ती महासंघाचे अध्यक्ष राजू मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले. एप्रिलचे वेतन देण्याची मागणी करीत कामगारांनी एकही वाहन कचरा संकलनासाठी नेले नाही. माहिती मिळताच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी कंपनी व कामगारांची भेट घेऊन तोडगा काढण्याच्या सूचना केल्या. मात्र, तोडगा निघू शकला नाही. दरम्यान सायंकाळी वाद मिटल्याचे श्री. भोंबे यांनी सांगितले. 

महापालिकेमार्फत काम सुरू
कामगार ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने महापालिकेच्या यांत्रिकी विभागामार्फत वाहने लावून कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले. सोमवारीदेखील महापालिकेने काम सुरू केले होते; मात्र या वेळी कामगारांनी वाहने अडविली होती. पुन्हा असा प्रकार घडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा श्री. भोंबे यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Garbage question in Aurangabad city