दिलासादायक : जालना शहराचा पाणी प्रश्न मिटला, घाणेवाडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले

उमेश वाघमारे
Thursday, 13 August 2020

जालना शहराला घाणेवाडी जलाशय व पैठण येथील जायकवाडी धरणावरून पाणी पुरवठा होतो. नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जातो.

जालना : मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसह पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. जालना शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय यंदा आॅगस्टमध्येच पूर्ण क्षमतेने भरले असून पैठण येथील जायकवाडी धरणातही पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे जालना शहराचा पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

जालना शहराला घाणेवाडी जलाशय व पैठण येथील जायकवाडी धरणावरून पाणी पुरवठा होतो. नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील नवीन जालना भागाला घाणेवाडी जलाशयातून पाणी पुरवठा केला जातो. तर जुना जालना भागाला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो. मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यासह जायकवाडी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे जालना शहराला पाणी पुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. परिणामी नवीन जालना भागाचा पुढील वर्षभराचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. 

तर पैठण येथील जायकवाडी धरण क्षेत्रातही यंदा आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. परिणामी जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू आहे. आज घडीला जायकवाडी धरण हे 50 टक्क्यांपेक्षा अधिक भरलेले आहे. याच जायकवाडी धरणातून जालना शहरालाही पाणी पुरवठा होत असून जुना जालना भागातील नागरिकांना हा पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान जायकवाडी धरणात पाण्याची पातळी वाढत असल्याने जालना शहराचा ही पुढील वर्षभराचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे.  

अंबड शहराचा प्रश्न संपुष्टात... 

अंबड शहरालाही जालना-जायकवाडी या योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जात आहे. जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने जालना शहरासह अंबड शहराचा पुढील वर्षभराचा पाणी प्रश्न संपुष्टात आला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ghanewadi reservoir in Jalna is filled to full capacity