मुलीच्या वडिलाची दाढी, कटिंग करणार मोफत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

प्रबोधनाचा अभाव असल्यामुळे समाजात अनेक अडचणी भेडसावत आहे. समाजाची मानसिकता बदलण्यासाठी, तसेच बेटी बचाव, बेटी पढावच्या जनजागृतीसाठी हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.
-पांडुरंग शिंदे

कळंब - मुलीच्या वडिलाची सहा महिने दाढी, कटिंग व मुलीचे जावळ मोफत असा एक अनोखा उपक्रम कळंब येथील नाभिक तरुणाने सुरू केलेला आहे.

समाजात वंशाचाच दिवा पाहिजे म्हणून मुलांच्या तुलनेत मुलीला दुय्यम दर्जा दिला जातो; मात्र दिवसेंदिवस मुलीचे घटते प्रमाण ही गंभीर बाब आहे.

‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेअंतर्गत शासनस्तरावरून विविध उपक्रम घेतले जाताहेत; मात्र येथील नाभिक समाजातील एका युवकानेही बेटी बचावसाठी पुढाकार घेतला आहे. मुलींचे जन्मदर प्रमाण वाढण्यासाठी या युवकाने स्वत:च्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आगामी दोन महिन्यांत कन्यारत्न झाल्यास संबंधित मुलीच्या वडिलाची सहा महिने मोफत दाढी व कटिंग, तसेच मुलीचे जावळही मोफत काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे.

हातावर पोट भरणाऱ्या नाभिक समाजातील पांडुरंग शिंदे या युवकाचा उपक्रम कौतुकास्पद आहे.

त्याचे शहरातील राजमाता जिजाऊ चौकात तिरुपती जेन्टस पार्लर नावाचे दुकान आहे. एकुलती एक मुलगी चैताली हिच्या आठव्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजात मुलींचे प्रमाण वाढावे, मुलींनाही मुलाप्रमाणे वागणूक मिळावी, म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. या अनोख्या उपक्रमामुळे पांडुरंग शिंदे याचे शहरातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

Web Title: Girl's father beard, cuttings will be free

टॅग्स