नागसेनवनात आज उसळणार धम्मसागर

योगेश पायघन
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

  • जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दलाई लामा यांचे आज आगमन 
  • शिस्तबद्ध नियोजन, देशविदेशातील उपासक-उपासिका दाखल 

औरंगाबाद : जागतिक बौद्ध धम्म परिषदेला शुक्रवारी (ता.22) सायंकाळी पाच वाजता सुरवात होत आहे. या तीनदिवसीय परिषदेसाठी शांततेचा नोबेल पुरस्कार विजेते तसेच धम्मगुरू दलाई लामा यांचे आगमन होत आहे.

शिस्त व नियोजनबद्ध तयारी केलेल्या या परिषदेला देशविदेशासह कानाकोपऱ्यातून उपासक-उपासिका नागसेनवनात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. नागसेनवनातील पीईएसच्या मैदानावर तीन दिवस बौद्ध धम्मावर चर्चा, परिसंवाद होऊन काही ठराव मांडले जाणार आहेत.

परिषदेचे मुख्य आकर्षण दलाई लामा आहेत. त्यांच्यासह अखिल भारतीय भिक्‍खू संघाचे संघानुशासक भदन्त सदानंद महास्थवीर, श्रीलंकेचे भदन्त महानायक महाथेरो डॉ. वरकगोडा, भदन्त बोधिपालो महाथेरो (लोकुत्तरा), भदन्त चंदिमा (सारनाथ), भदन्त मैत्री महाथेरो (नेपाळ), भदन्त संघदेसना (लडाख), भदन्त शिवली (श्रीलंका), भदन्त वॉनसन (साऊथ कोरिया), भदन्त प्रधामबोधिवॉंग, भदन्त प्रहमा केयरती श्रीउथाना (थायलंड), भदन्त पीच सेम (कम्बोडिया) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे व थायलंडच्या उद्योजिका रोचना व्हॅनिच कांबळे परिषदेच्या मुख्य संयोजक आहेत.

हेही वाचा -  कुपोषणाची छावणी 

सेल्फी पॉइंट-चित्रप्रदर्शन

क्रांती चौक, मिलिंद महाविद्यालयासमोर या परिषदेची आठवण आणि येथील ऐतिहासिक वारसा यांची ओळख करून देणारे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले आहेत. पीईएसच्या मैदानावर भव्य मंडप, शिस्तबद्ध आसन व्यवस्था, एलईडी, धम्मगुरूंना बसण्यासाठी स्टेज, प्रवेशद्वारावर हत्तीचे स्टॅच्यू असे नियोजन करण्यात आले आहे. पोलिसांच्या दृष्टीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक मेहनत घेत आहेत. यानिमित्त मालती आर्ट गॅलरीत 20 कलाकारांनी रेखाटलेले चित्रांचे प्रदर्शन खुले करण्यात आले आहे.

आज होईल उद्‌घाटन 

श्रीलंकेचे महानायका महाथेरो डॉ. वरकगोडा यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी सहा वाजता होईल. यावेळी 13 देशांतील प्रमुख भिक्‍खू, विचारवंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शनिवारी व रविवारी पहाटे सहा ते आठपर्यंत पीईएसच्या मैदानावर विपश्‍यना होईल. ज्येष्ठ भदन्त हे उपासक-उपासिकांना विपश्‍यनेचा सप्रयोग अर्थ उलगडून दाखवतील. 

लोकुत्तरा महाविहारात केवळ भिक्‍खूंसाठी सत्र

शनिवारी सकाळी नऊ ते बारादरम्यान चौका येथील लोकुत्तरा महाविहारात केवळ बौद्ध भिक्‍खूंसाठी संवाद सत्र होणार आहे. दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत बौद्ध संस्कृती आणि जीवन जगण्याचा मार्ग या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5.30 ते रात्री 9.30 या वेळेत बुद्धांनी दिलेली शिकवण याचे विश्‍लेषण जगभरातून आलेले ज्येष्ठ भिक्‍खू करणार आहेत. हे दोन्ही परिसंवाद व चर्चा पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत.

रविवारी पीईएस मैदानावर दलाई लामा यांची धम्मदेसना

रविवारी पहाटेच्या विपश्‍यनेनंतर सकाळी 9.30 वाजता दलाई लामा यांची धम्मदेसना होणार आहे. दुपारी एकपासून तीन वाजेपर्यंत युवकांसाठी एक सत्र होणार आहे. दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत उपासक-उपासिका व त्यांच्या कुटुंबासाठी एक स्वतंत्र सत्राचे आयोजन केले आहे. रात्री 8.30 वाजता सुरू होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर परिषदेची सांगता होईल. 

उद्योजक प्रदर्शन 

मुख्य प्रवेशद्वारासमोर अडीच हजार स्क्वेअर मीटरचे डोम उभारण्यात आले असून, त्यात बुद्धिस्ट 75 उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनातून उद्योगक्षेत्रातील प्रगती जगासमोर आणण्याचा प्रयत्न असल्याचे संयोजक रत्नदिप कांबळे यांनी सांगितले.

आयसीयूचे सेटअप

पीईएसच्या मैदानावर गेट क्रमांक एक शेजारी एक आयसीयू सेटअप लावण्यात आले आहे. त्यात आपत्कालीन उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. भारत सोनवणे, डॉ. गोवर्धन गायकवाड, डॉ. संजय पगारे, डॉ. अनिल वाघमारे आदींसह डॉक्‍टर या आयसीयूत तसेच लोकुत्तरा विहारात उभारण्यात आलेल्या आयसीयूत काम करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Globle buddhist conference in Aurangabad today